आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद लुटला

आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद लुटला

आषाढी वारी सुरु झाल्याने महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण झाले आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळयाचे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे. वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने आज सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थान केले होते. आज नीरा येथील दत्त घाटावर माउलींच्या पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत केले जाते त्या नंतर माउलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढून माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून वारीमध्ये सुरु आहे.

पुणे, जेजुरी, वाल्हे या मार्गाने माऊलींची पालखी लोणंद या गावी पोहोचते. त्या शी नीरा स्नानाची प्रथा पार पडते. कोळी समाज त्यांच्या होडीमधून माऊलींची पालखी नीरा नदीतून पुणे – सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देतात. आणि माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येतं तेव्हा पासून ही परंपरा सुरु आहे आणि या परंपरेत खंड पडू नये ही परंपरा अविरत सुरु रहावी म्हणून कोव्हीड संदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन, नियमांचं पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पडला.

हे सुद्धा वाचा – कोणता मुख्यमंत्री येणार विठ्ठलाच्या दारी? उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस

 

– संपुर्ण वारीत एकूण तीन वेळा स्नान

आषाढी वारीच्या संपूर्ण मार्गांमध्ये तीन वेळा ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. सर्वात आधी आळंदी येथून प्रस्थान होण्याआधी माउलींच्या पादुकांना इंद्रायणी नदी मध्ये स्नान घालण्यात येते. त्यानंतर आज नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येतं आणि शेवटी पंढरपूला पोहोचल्यावर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घातलं जातं

हे सुद्धा वाचा – पीओपीच्या मूर्तींवर बंदी कायम, पण गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत

– लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांचा सहभाग

कोव्हीडमुळे गेली दोन वर्षे आषाढी वारीचा सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीमध्ये मागील दोन वर्षांची कसर वारकरी भरून काढत आहेत. विठ्ठल नामाच्या जयघोषात हि आनंदवारी अगदी उत्सहात सुरु आहे. या वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी झाले आहेत. या वारीदरम्यान पालखी मार्गावरीलही लहान – मोठ्या गावांमध्ये ग्रामस्थ उत्साहाने वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. माउलींच्या पालखी दर्शनासाठी सुद्धा भक्तगण मोठी गर्दी करत आहेत. दिवेघाटाचा पालखीचा कठीण टप्पा पार केल्यानंतर पालखी खंडेरायाच्या जेजुरीमध्ये विसावा घेते. जेजुरी वासी देखील पालखीचं खूप आनंदात आणि उत्सहात स्वागत करतात. या सोन्याच्या जेजुरीमध्ये भक्त भंडाऱ्याची उधळण करत अभंगाच्या तालावर ताल धरतात. विठुरायाचा जयघोष करत भक्तगण वारीत सहभागी होत असतात. यंदाची वारी पायी होत असल्याने वारकरी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. त्यामुळे वातावरण देखील मंगलमय झाले आहे. आज वाल्हे येथील मुक्कामानंतर वारी लोणंदच्या दिशेने प्रस्थान करेल. त्यापूर्वी पादुकांना नीरा स्नान घातलं जातं. नीरा नदीच्या तीरावर वारकरी अभंग गात आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत या सोहळ्याचा आनंद लुटतात.

त्यामुळे यंदाची ‘आषाढी वारी’ पायी होत असल्याने वारकऱ्यांसाठी नक्कीच ‘आनंद वारी’ ठरली आहे.

 

First Published on: June 28, 2022 1:13 PM
Exit mobile version