बाळासाहेबांच्या मनधरणीसाठी अशोक चव्हाण सक्रिय; म्हणाले, पक्षवाढीसाठी वाट्टेल ते!

बाळासाहेबांच्या मनधरणीसाठी अशोक चव्हाण सक्रिय; म्हणाले, पक्षवाढीसाठी वाट्टेल ते!

मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुंबीयांबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Maharashtra Chief Nana Patole) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील कलाहामागे नाना पटोलेच आहे असा स्पष्ट दावा काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्येही फूट पडण्याची चिन्ह असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात आता पक्षालाच रामराम ठोकू शकतील अशी चर्चाही सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, “बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे. बाळासाहेब थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत.”

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काही कॉंग्रेस आमदारांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. कॉंग्रेस पक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अनेक नेते दिल्ली दरबारी तक्रारी करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. अशात आता बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढदिवशीच राजीनामा बॉम्ब टाकल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षातील त्यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत संवाद साधत पक्षाच्या व्यासपीठावरच याबाबत चर्चा व्हावी अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.

हेही वाचा भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्यांच स्वागतच…; थोरातांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचं सूचक विधान

बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तक्रारीचं पत्र दिलं होतं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाढत असलेला वाद पाहता येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रभारी एच.के. पाटील यांनी काँग्रेस आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये थोरात आणि पटोले यांच्या नेतृत्वाबाबत थेट चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र, या बैठकीआधीच बाळासाहेब थोरात यांनी थेट विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच सोपवल्याने आता राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.

First Published on: February 7, 2023 3:27 PM
Exit mobile version