मार्केटची हवा, काय आहे भावा ?

मार्केटची हवा, काय आहे भावा ?

कार्यकर्ता :-भाऊ, ते राष्ट्रीय समता पक्षाचे झेंडे, रिबिन्स आणि हातात बांधायचे बँड आहेत का ? आणि हो बॅनर पण छापायचे होते.

दुकानदार :- दादा, कोणासाठी हवे आहेत? म्हणजे उमेदवार कोण आहे ?

कार्यकर्ता:- ते उत्तमदादा एकनिष्ठ यांच्या ऑफीसमधून आलोय.

दुकानदार :- अरे, पण गेल्यावेळी तर ते सबका विकास पक्षात होते? आणि त्याच्या आधी हिंद सेना.

कार्यकर्ता:- हो भाऊ, पण इतर नेत्यांच्या तुलनेत म्हणायचे तर आमचे दादा त्या मानाने बरे, हो ना ?

दुकानदार:- पण तुला त्याच पक्षाचे झेंडे आणि इतर साहित्य हवे आहे, हे फिक्स आहे ना?

कार्यकर्ता :- हो भाऊ, किती वेळा तुम्ही खात्री करताय?

दुकानदार : करावी लागते दादा, गेल्या पंधरा दिवसांत 10 ऑर्डर कॅन्सल झाल्या आहेत.

कार्यकर्ता:- का हो?

दुकानदार – अहो का काय ? आधी एक ऑर्डर द्यायची आणि मग दुसर्‍या पक्षात जाऊन आता सामान नको म्हणूूूूूूूूूूूूूूूूूूूून सांगून टाकतात. बाकी काही नाही हो बनवलेले झेंडे फुकट जातात. त्यामुळे झेंड्याचा रंगदेखील बदलतो. नेत्यांनी पक्ष बदलण्याइतके छापलेल्या झेंड्याचा रंग बदलणे सोपे नाही. म्हणून आता फक्त सबका विकास आणि हिंद सेनेचेच झेंडे ठेवले आहे. म्हणून म्हणतो, एकदा पुन्हा फोन करून विचारा.

कार्यकर्ता:- अहो पण, मी आता एका तासापूर्वीच विचारून आलोय.

दुकानदार:- अहो, गेल्या निवडणुकीला बाजूच्या पक्षाच्या कार्यालयातून एकजण बॅनरची ऑर्डर देऊन गेला होता, पाच मिनिटांत त्याच्या पक्षातील सर्वजण दुसर्‍या पक्षात गेले.

कार्यकर्ता:- मग काय झालं ?

दुकानदार:- काय होणार, चार पावसाळे गळक्या छताला त्याच बॅनरचा वापर केला त्याने? एकनिष्ठ होण्याचा बिचार्‍याला तेवढाच फायदा झाला. म्हणून तुम्हाला बोलतो, पुन्हा विचारून घ्या.

कार्यकर्ता:- ओके. ठीक आहे.

(कार्यकर्ता फोन करतो, आनंदाने उड्या मारत)

भाऊंनी घरवापसी केली, पुन्हा सबका विकास पक्षात प्रवेश केला.

दुकानदार:- मी बोललो होतो ना !

कार्यकर्ता:- हो भाऊ, आता लवकर सबका विकास पक्षाचं साहित्य बनवायला घ्या. आता उशीर नको. मी उद्या संध्याकाळी येतो. कारण सकाळी पक्षप्रवेशाचा ‘मेगा’ कार्यक्रम आहे. चला येतो.

First Published on: September 11, 2019 6:38 AM
Exit mobile version