नेहमीसारखेच भाजपकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात

नेहमीसारखेच भाजपकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आणि बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला. ज्यामुळे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसची साथ सोडतात का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण काँग्रेसच्या हायकमांडकडून बाळासाहेब थोरात यांची नाराजगी दूर करण्यात यश आलेले आहे. ज्यामुळे आज (ता. १५ फेब्रुवारी) होणाऱ्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला बाळासाहेब थोरात हजर राहणार आहेत. दरम्यान, याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सांगण्यानुसार करण्यात आला, असा गौप्यस्फोट केला होता. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावरून सध्या वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत आहेत. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे की, ”जर शरद पवार साहेबांना विचारून पहाटेचा शपथविधी झाला असता तर, तेव्हा ते सरकार पडले नसते. त्यामुळे माझे पक्के मत आहे की, पहाटेचा शपथविधी पवार साहेबांना विचारून करण्यात आला नव्हता.” तसेच विकासाच्या मुद्द्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी तसेच आता दुसरं काही नाही म्हणून वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न करण्यात येत असल्याचे देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले. वाद निर्माण करणे हे भाजपच्या कामाचे वैशिष्ट्य आहे, असा टोला देखील थोरातांनी यावेळी भाजपला लगावला.

हेही वाचा – फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर आणखी एका नेत्याचा खुलासा

दरम्यान, यावेळी बाळासाहेब थोरात यांनी आसाम सरकारकडून दावा केलेल्या ज्योतिर्लिंगाबाबत देखील मत व्यक्त केले आहे. थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगाची पूर्वापार परंपरा आहे. याबाबतच्या अनेक नोंदी देखील आहेत. त्यामुळे भीमाशंकरचा वाद होण्याचे कारण नाही. आसामकडून हे महाराष्ट्रातील जनतेच्या श्रद्धेला धक्का लागण्यासारखे आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात तीन ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर हे त्यापैकी एक आहे. आणि याचे पुरावे सुद्धा आहेत, असेही थोरात म्हणाले. तर अलीकडच्या काळात काय काय पळवून न्यायचे असाच प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील ज्या लोकांनी याबद्दल बोलायला पाहिजे, ते लोक उत्तर देत नाहीयेत असेच दिसत आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर टीका देखील केली आहे.

First Published on: February 15, 2023 3:56 PM
Exit mobile version