Balu Dhanorkar Political Journey : कोण आहेत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर?

Balu Dhanorkar Political Journey : कोण आहेत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर?

लोकसभेत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रश्नांची बाजू मांडणारे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar Death) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज बाळू धानोरकर यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर यांचे निधन काँग्रेससाठी मोठा फटका मानला जात आहे. कारण महाराष्ट्रातील ते एकमेव खासदार होते. परंतु, त्यांच्या निधनामुळे आगामी काळात काँग्रेसला पोटनिवडणुकीचा सामना करावा लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Balu Dhanorkar Political Journey Maharashtra Congress MP Read In Marathi)

खासदार बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आखलेल्या रणनीतीनंतर महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नाही, असे वातावरण निर्मित करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी अनपेक्षित असा बाळू धानोरकर यांचा विजय झाला. चंद्रपूरच्या मतदारसंघात त्यांनी चक्क केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती. बाळू धानोरकर यांच्या विजयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्रातील एकमेव खासदार असला तरी, लोकसभेत महाराष्ट्राचे प्रश्नांना काँग्रेसकडून आवाज दिला जाणार होता. त्यामुळे अनेकदा बाळू धानोरकर हे नाव चर्चेत होते.

बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव होते. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यांनी लवकरच पूर्ण केला. युतीच्या सरकारच्या काळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. २०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला. परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

सुरेश उर्फ बाळू धानोरकर

विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार

सुरूवातीला बाळू धानोरकर चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदार पदाचाही राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.

झटपट काम करणारा नेता

आक्रमक आणि स्पष्टवक्ता म्हणून बाळू धानोरकर यांना राजकीय वर्तुळात ओळखले जातात. लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम करणारी कामे करण्याला त्यांचे प्राधान्य असते. एकाच कामासाठी लोकांना वारंवार खेटे घालायला नको म्हणून बाळू धानोरकर परमनन्ट सोल्यूशन काढण्यावर भर देतात. पुन्हा निवडून येण्यापुरती कामे मी कधी करत नाही. लोकांना खोटी आश्वासने देत नाही. माझ्याकडून काम होणार नसेल तर मी लोकांना तसे स्पष्टपणे सांगतो, हा बाळू धानोरकरांचा खाक्या आहे.

(हेही वाचा – प्रदेशाध्याक्ष बदलण्याच्या चर्चेला नाना पटोलेंचे उत्तर; म्हणाले, “मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून…”)

धोका पत्कारण्याची वृत्ती

बाळू धानोरकर हे सुरुवातीपासूनच राजकारणात कोणताही धोका पत्कारण्याची तयार ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भद्रावती नगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज संसदेपर्यंत येऊन पोहोचला होता. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

अनेक गुन्ह्यांची नोंद

बाळू धानोरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. याच कारणावरून त्यांना दोनवेळा तडीपार करण्यात आले होते. या काळात अनेकजण मला ‘तुम्हारा आदमी तडीपार है’, असे ऐकवून दाखवत. त्या काळात मला आणि मुलांना त्यांची भेट घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागायचे, अशी आठवण प्रतिभा धानोरकर सांगतात.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2004 नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. बाळू धानोरकर यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. काँग्रेसच्या यादीत धानोरकरांना तिकीट नाकारले गेले. मोठा गदारोळ झाला. धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण त्रिकूट मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारी पोहोचले. तोवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीला द्या असा निरोप राहुल गांधींना दिला होता. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऐनवेळी चक्रे फिरवून बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यासाठी धानोरकर यांच्या समर्थकांनी अगदी राहुल गांधी यांच्यापर्यंत फिल्डिंग लावली होती. विजय वडेट्टीवार यांनी बाळू धानोरकर हे कसे विनिंग कँडिटेट आहेत, हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिले.

बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली

२०१९ च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यात दोन खासदार निवडून आले होते. मात्र, २०१९ मध्ये हा आकडा फक्त एका खासदारावर आला. ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये विजय मिळवून पक्षाची लाज राखली.

अखेर प्रवास संपला

बाळू धानोरकर यांनी लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका, मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले होते. मात्र, शुक्रवार २६ मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुंतागुंत वाढल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या मेदांता हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांचे निधन झाले.

First Published on: May 30, 2023 7:59 AM
Exit mobile version