भुयार खोदून बॅंक लुटणाऱ्या चोरट्यास भिवंडीतून अटक

भुयार खोदून बॅंक लुटणाऱ्या चोरट्यास भिवंडीतून अटक

सोलापूरात पोलिसांच्या हाती लागले मृतदेहाचे तुकडे केलेले पोते  

घरफोडी, वाहन चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशाप्रकारच्या गन्ह्यांना आळा घालण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईतून तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल २८ गुन्ह्यांची उकल करीत ४२५ ग्राम सोन्याचे दागिने, सात दुचाकी, दोन मोबाईल आणि घरफोडीतील सिगरेट असा एकूण १८ लाख ४७ हजार ८७४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. विशेष म्हणजे नवी मुंबई येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत भुयार खोदून लॉकरमधील मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार दीपक दयाराम मिश्राला भिवंडीतून अटक करण्यात आली आहे. दीपक दयारामला अटक केल्यानंतर त्याने इतर गुन्ह्यांची कबूली दिली आहे. त्याच्याकडून २०३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

६ दुचाकी हस्तगत

दुसरीकडे नारपोली येथील एका चेन स्नॅचिंगच्या घटनेचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुरी नगर भिवंडी येथील फैयाज उर्फ पपलू इम्तियाज अन्सारी या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडे दहा महागड्या चेन आणि दोन मोबाईल मिळाले आहेत. अन्सारीने सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल गैबी नगर येथील मुस्कान ज्वेलर्सचा मालक रंजन वाहिद शेखला दिला होता. त्यामुळे गुन्हे शाखेने त्यालाही अटक करत त्याच्याकडून २२३ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत. भिवंडीच्या नागाव येथील इमरान उर्फ इसाक इस्माईल शेख या सराईत वाहन चोरास पोलिसांनी अटक केली. त्याने नारपोली, शांतीनगर, मुंब्रा, श्रीनगर, हिललाईन या पोलीस ठाणे हद्दीतून सात वाहन चोरी केल्या होत्या. भिवंडी वाहतूक गुन्हे शाखेचे शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने या कारवाईतून १८ लाख ४७ हजार ८७४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

First Published on: April 12, 2019 6:28 PM
Exit mobile version