भंडारा दुर्घटना: सिव्हिल सर्जनसह सहाजणांवर निलंबनाची कारवाई

भंडारा दुर्घटना: सिव्हिल सर्जनसह सहाजणांवर निलंबनाची कारवाई

भंडारा दुर्घटना

संपूर्ण देश हादरवून सोडणार्‍या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकारानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेला जबाबदार ठरवत सिव्हिल सर्जन, डॉक्टर यांच्यासह सहाजणांना निलंबित करण्यात आले आहे. सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा
9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आले होते. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचे समोर आले आहे.

7 जणांवर कारवाई, 6 जणांचे निलंबन
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेसंबंधीचा अहवाल काल उशिरा आरोग्य विभागाला मिळाला. त्या अहवालानुसार रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्याने आग लागली होती. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही आग लागली. रूम बंद आणि तिथे प्लास्टिक असल्याने आग पसरली. 2015 मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नाही. आगीमागे ते कारणही आहे. तसेच तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

First Published on: January 22, 2021 6:59 AM
Exit mobile version