Bharat Sasane : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

Bharat Sasane : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

Bharat Sasane : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यध्यपदी भारत सासणे

2022 मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर भारत सासणे यांची बिनविरोधात निवड झाली आहे. यंदा लातूरच्या उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज उदगीरमध्ये महामंडळाची एक बैठक पार पडली या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनावेळी देण्यात आली होती. त्यामुळे कोरोना परिस्थिती पाहता येता तीन महिन्यात या संमेलनाची तारीख पक्की होईल. भारत सासणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सासणे यांनी मराठी साहित्यविश्वात एक मोठं योगदान दिले आहे.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गेली अनेक वर्षे भारत सासणे यांचे नाव चर्चेत होते. मात्र गेली दोन अध्यक्षपदाच्या निवडीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे भारत सासणे यांचे नाव मागे पडले. मात्र उस्मानाबाद इथे पार पडलेल्या संमेलनात अध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि नुकत्याच नाशिक साहित्य संमलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर सक्रिय न दिसल्याने यापुढे चालत्या-बोलत्या अध्यक्षाची नेमणूक करा असे महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी बजावून सांगितले. त्यानुसार आता उदगीरमध्ये पार पडणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी भारत सासणे यांची निवड करण्यात आली.

दरम्यान मराठवाडा साहित्य परिषद आणि उदगिरी महाविद्यालय या संमेलन संस्थांची सासणे यांच्या नावाला पसंती होती. शिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ तसेच संबंधीत संस्थांनी देखील सासणे यांच्या नावाचा आग्रह केला होता.

भारत सासणे यांचा थोडक्यात परिचय

२७ मार्च १९५१ रोजी जालना येथे भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म झाला. अहमदनगर महाविद्यालयातून त्यांनी बी.एससी ही पदवी घेतली. यादरम्यान विविध शासकीय अधिकाऱ्याची पद त्यांनी सांभाळली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे यांचे नाव घेतले जाते. त्या काळातील एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. नव्या कथांना आत्मसात करत त्या आपल्या वेगळ्या ढंगात तयार करण्याची कला सासणे यांच्याकडे आहे.

ग्रामीण, आदिवासी, नागर असा समाजजीवनाचे विविध पैलू, सामाजिक परिस्थिती, स्वभावधर्म त्यांच्या कथांमधून उलघडतात. तसेच मानवी जीवनातील असंगतता, नातेसंबंध त्यातील ताणतणाव, मनोविश्वातील गूढ, गुंता त्यांच्या कथांमधून वाचता येतो. तर अनेक कथांमधून गंभीर, शोकाकुल, भावजीवनातील विलक्षण अस्वस्थता दिसून येते. याशिवाय स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म भाग त्यांनी उलगडून दाखवला आहे. आत्तापर्यंत त्यांनी २८ हून अधिक पुस्तके लिहिली आहे.

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने भारत सासणे यांचे आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन केले आहे.


30 वर्षानंतर शनि देवांचा कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ४ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल चांगला नफा


First Published on: January 2, 2022 3:08 PM
Exit mobile version