भीमा-कोरेगाव हिंसाचाराला कोणतीही संघटना जबाबदार नाही; पवारांचे घुमजाव

भीमा-कोरेगाव हिंसाचाराला कोणतीही संघटना जबाबदार नाही; पवारांचे घुमजाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

भीमा-कोरेगाल येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एक निष्पाप तरुण नाहक बळी पडला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंसाचाराच्या दुसऱ्याच दिवशी या घटनेला हिंदुत्ववादी संघटना जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र आता पवारांनी आपल्या जुन्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे. हिंसाचारासाठी कोणत्याही एका संघटनेला जबाबदार धरणार नाही, असे वक्तव्य पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती समोर केले आहे. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार तपास समितीने चौकशी अहवाल सादर केलेला आहे. या चौकशी अहवालावर प्रश्न विचारला असताना पवार यांनी वरील वक्तव्य केले. मात्र पवारांच्या आधीच्या आणि आताच्या वक्तव्यामध्ये विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. ‘पुण्यातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी’ भीमा कोरेगाव येथे हिंसा पसरवली असून ही माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली असल्याचे वक्तव्य पवार यांनी २ जानेवारी रोजी केले होते.

हे वाचा – भीमा-कोरेगाव दंगलीमागे एल्गार परिषदेचा हात – सत्यशोधन समिती

भीमा कोरेगाव चौकशी समितीसमोर प्रतिज्ञापत्राद्वारे आपले म्हणणे मांडणारे शरद पवार हे पहिलेच राजकारणी आहेत. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल या समितीचे प्रमुख आहेत. तर माजी राज्य सचिव सुमित मुलिक समितीचे सदस्य आहेत. समितीने याआधीच चौकशीचे अनेक सत्र घेतले असून शंभरहून अधिक प्रतिज्ञापत्रे त्यांच्याकडे जमा झाली आहेत.

शरद पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. भीमा कोरेगाव परिसर आणि पुण्यातील काही गावांमध्ये नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्याची सुरक्षा यंत्रणाच यामधील सत्य समोर आणू शकते, असेही पवार म्हणाले आहेत.

‘तर कोरेगाव-भिमा हिंसाचार टाळता आला असता!’

First Published on: October 26, 2018 11:30 AM
Exit mobile version