आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मोठी फूट, कोळी बांधवांनी केला शिंदे गटात प्रवेश

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मोठी फूट, कोळी बांधवांनी केला शिंदे गटात प्रवेश

मुंबई – आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील तब्बल ५०० कोळी बांधवांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. वर्षा बंगल्याबाहेर हे कोळी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोळी बांधवांनी पक्षप्रवेश केला. कोस्टल रोडबाबत कोळी बांधवांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने विविध मागण्या केल्या होत्या. मात्र, त्या पूर्ण न झाल्याने कोळी बांधवांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा – मिलिंद नार्वेकर कुठे? ते तर बालाजी चरणी भक्तीत दंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेक समाजातील बांधवांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच, वरळी कोळीवाडा मतदारसंघातील कोळी बांधवांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांच्या मागण्या अपूर्ण ठेवल्या. त्यांना भेटीची वेळ दिली नाही. गेले चार वर्षे आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भेट होऊ शकली नाही. अखेर आम्ही आता एकनाथ शिंदे यांची मदत घ्यायचं ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जवळपास ५०० पेक्षा जास्त कोळी बांधवांनी गर्दी केली. कोळी समाजातील काही पदाधिकारी यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय.

हेही वाचा – महाराष्ट्रात हॅलोऐवजी आता वंदे मातरम, राज्य सरकारचा जीआर

बंडखोरी झाल्यानंतर फक्त वरळीतून एकही पदाधिकारी, नेता शिंदे गटात गेला नव्हता. त्यामुळे वरळी-कोळीवाडा हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सेफ झोन ठरला होता. मात्र, दहीहंडीपासून येथे हालचाली वेगाने वाढलेल्या दिसल्या. भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मानाची दहीहंडी वरळीत आयोजित केली होती. त्यानंतर, गणेशोत्सव काळातही अनेक ठिकाणी शिंदेंना समर्थन करणारे बॅनर लागले होते. त्यामुळे वरळी मतदारसंघही शिवसेनेच्या हातून जातोय की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, कोळी बांधवांचं वर्चस्व असलेल्या वरळी कोळीवाडा मतदारसंघातून जवळपास ५०० कोळीबांधव जर शिंदे गटात सामील झाल्याने आदित्य ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेला हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेत झालेली ही सर्वांत मोठी फूट ठरणार आहे.

आपण बाकीचे प्रश्न लवकरच सोडवू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कोळी बांधवांना दिले. तसेच, शिक्षकांचेही प्रश्न सोडवायचे आहेत. अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

First Published on: October 2, 2022 11:22 AM
Exit mobile version