राजीनामा नको, राठोड यांना अटक करा; भाजप नेते राठोडांच्या राजीनाम्यावर आक्रमक

राजीनामा नको, राठोड यांना अटक करा; भाजप नेते राठोडांच्या राजीनाम्यावर आक्रमक

राजीनामा नको, राठोड यांना अटक करा; भाजप नेते राठोडांच्या राजीनाम्यावर आक्रमक

वनमंत्री संजय राठोड यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे म्हणाले की, ‘विरोधी पक्षाचा दबाव असल्यानेच आणि भाजपच्या महिला आघाडीने आंदोलन केल्याने १८ दिवसांनंतर राजीनामा दिला. एफआयआर दाखल होण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणात राठोड यांना अटक करण्याची गरज आहे. शिवसेना बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच कुठे? असे माझे प्रामाणित मत आहे. विरोधी पक्षाच्या दबावामुळेच अधिवेशनाच्या तोडांवर हा राजीनामा देण्याची नामुष्की संजय राठोड यांच्यावर आली आहे.’

अधिवेशनात तोंडावर पडणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला राजीनामा – राम कदम

‘भारतीय जनता पार्टी ज्या आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आणि आंदोलन केली. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेच्या एका अर्थाने विजय झाला आहे. महाराष्ट्राच्या तीन सत्ताधारी पक्षाची ही नामुष्की आहे. कारण ३० दिवसांच अधिवेशन घेण्याची याची हिंमत नाही. देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्याची याची हिंमत नाही. त्यामुळे घाबरलेलं सरकार अधिवेशन आठ दिवसांच घेतंय. हा विषय भारतीय जनता पार्टीचे नेते आक्रमकपणे उचलून धरतील आणि यामुळे आपली कोंडी होईल. त्यामुळे आपली कोंडी होऊ नये म्हणून हा अशाप्रकारचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्या अधिवेशन आणि आज तुमची झोप उडते? उद्या अधिवेशन आज तुम्ही निर्णय घेता? मग १५ दिवस काय झोपला होतात का? कोणती कुंभकर्णाची निद्रा होती तुमची? कोणते कानात कापसाचे गोळे घातले होते? महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारत होती, त्यावेळेस तुमचा कोणता अहंकार मधे आला? महाराष्ट्राच्या सरकारला या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. अधिवेशन तोंडापाशी आलं आणि अधिवेशनात तोंडावर पडला, तेव्हा हा निर्णय घेतला. याच्या अगोदर निर्णय का घेतला नाही?’ असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. तसंच ते पुढे म्हणाले की, ‘जरी हा निर्णय घेतला असला तरी अनेक प्रश्नांची उत्तर अजून महाराष्ट्राच्या सरकारकडे नाहीत. त्यामुळे केवळ हेच कारण आहे, ३० दिवसांच अधिवेशन आठ दिवसात संपवण्याचं.’

राजीनामा दिला म्हणजे निर्दोश आहोत असे होत नाही  – प्रविण दरेकर

महाराष्ट्रासह महाराष्ट्र सरकारची अब्रु वेशीला टांगल्यानंतर २० दिवस उलटून गेल्यानंतर ही तुम्ही या प्रकरणात निर्णय घेऊ शकत नाही. पण देर है दुरूस्त है. भाजपाने ज्या आक्रमकतेने भूमिका मांडली, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याशिवाय अधिवेशन सुरू करणार नाही. रस्त्यावर उतरलो आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विजय झाला. या प्रकरणात राजीनामा घेतला परंतु, या प्रकरणात ज्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत आहे, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागणार. असे असले तरी पूजा चव्हाण हे प्रकरण या राजीनाम्यानंतर संपलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संजय राठोड यांचा कसा संबंध आहे किंवा नाही, याची चौकशी करणं आवश्यकच.. राजीनामा दिला म्हणजे निर्दोश आहोत असे होत नाही. तर संशयित म्हणून चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून येथे राजीनामा दिला आहे. मात्र आता भाजपाची मागणी अशी असेल की, FIR का दाखल करण्यात आला नाही, पूजा राठोड नेमकी कोण आहे? पोलिसांचा निष्काळजीपणा सरकारच्या दबावाखाली होता का? याचा तपास व्हावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.


हेही वाचा – माझे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न – संजय राठोड


 

भविष्यात अशाप्रकरणातील सत्य समोर येईल..- सुधीर मुनगंटीवार

भाजपच नाही तर हा आवाज महाराष्ट्रातील जनतेचा होता. पूजा चव्हाण आत्महत्येचं संपूर्ण प्रकरण हे संशयास्पद आहे. या प्रकरणामध्ये पुण्यातील ठाणेदाराची भूमिका पाहिली तर ती देखील संशयास्पद आहे. भविष्यात अशाप्रकरणातील सत्य समोर येईल तेव्हा त्याला निलंबित केलं पाहिजे. या प्रकरणातील इतके पुरावे समोर येत असताना देखील त्यांनी कोणतीही कृती केली नाही. तसेच एफआयआर नोंदवितांना देखील चालढकल केली. हा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे जाणे, त्यांनी तो राजीनामा मंजूर करणे, यासंदर्भातील चौकशी अधिकारी बदलवणे. यासंदर्भातील पुढील भूमिका आवश्यक आहे. तसेच, अधिवेशनात या प्रकरणासंदर्भात सरकारकडून निष्पक्षपणे चौकशी व्हावी, एवढीच तूर्तास अपेक्षा आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

जे धाडस उद्धवजींनी दाखवले आहे तेच धाडस शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत करावे – चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘दिशा कायदा सामान्यांसारखाच मंत्र्यांनाही आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळाला हवा, तो जोवर मिळत नाही तोवर आम्ही प्रकरण लावूनच धरणार आहोत. पूजा चव्हाण प्रकरणात ज्या कारणाने मृत्यू झाला असेल किंवा कोणाच्या दबावाने आत्महत्या झाली असेल ते कारण समोर यायलाच हवे. जे धाडस उद्धवजींनी दाखवले आहे तेच धाडस शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत करावे. उद्धवजींनी धनंजय राठोड यांच्या बाबतीत जो निर्णय घेतला, तो वेळेवर निर्णय करायला हवा होता.’

‘तुर्तास राजीनामा आला असला तरी तो स्वीकारला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही’

‘पहिल्याच दिवशी पूजा चव्हाण हे प्रकरण समोर आल्यानंतर हा राजीनामा यायला पाहिजे होता. याचे पूरावे समोर आल्यानंतर मंत्री पदावर राहणं हे चूकीचं आहे. कुठेतरी आपल्याला वरिष्ठाचा आशीर्वाद आहे, असी अवस्था दिसत असल्यामुळे हा राजीनामा समोर आला नाही. तुर्तास राजीनामा आला असला तरी तो स्वीकारला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ‘त्या’ पोलिसावर का कारवाई करण्यात आली नाही. त्याने अद्याप या प्रकरणावर FIR दाखल केला नाही. या प्रकरणातील संपूर्ण पुरावे समोर आल्यानंतर देखील हे प्रकरण पूर्णतः दाबण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणात महिला आघाडी, समाज माध्यामांनी दबाव टाकल्यानंतर सरकारला कोणताही पर्याय उरला नाही, त्यामुळे अखेर हा राजीनामा घेतला गेला आहे,’ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया


 

First Published on: February 28, 2021 4:11 PM
Exit mobile version