विनायक मेटेंच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान… नितिन गडकरींसह भाजपा नेत्यांनी केला शोक व्यक्त

विनायक मेटेंच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान… नितिन गडकरींसह भाजपा नेत्यांनी केला शोक व्यक्त

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वेवर त्याच्या गाडीचा अपघात झाला. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

विनायक मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त करत नितीन गडकरी म्हणाले की, “विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. मला दुःख होत आहे. विनायक मेटे माझे खूप जवळचे मित्र होते. अनेकदा आमची भेट झाली होती. राज्यातील विकास कामांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग होता. त्यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून मी एक चांगला मित्र गमावला आहे.” अशा शब्दांत विनायक मेटेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपला जवळचा मित्र गमावला अशा शब्दांत विनायक मेटे यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत लिहिलंय की, “या दुःखद बातमीवर विश्वास ठेवायला माझे मन अजूनही धजावत नाही. विनायकराव मेटे यांच्या निधनाने मी माझा कौटुंबिक मित्र गमावला आहे. माझे फार मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीच भरून निघणार नाही.”

नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याव्यतिरिक्त राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील विनायक मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी ट्वीट करत लिहिलंय की, “शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे. सामाजिक प्रश्नांची संवेदनशीलपणे जाण ठेवून त्यासाठी लढणारा नेता महाराष्ट्राने गमावल्याचे दुखः आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना.” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी देखील विनायक मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा :विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

First Published on: August 14, 2022 11:53 AM
Exit mobile version