मुंबई महापालिकेत शिंदे गटाला अडीच वर्षांसाठी उपमहापौर पद, भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला फॉर्म्यूला

मुंबई महापालिकेत शिंदे गटाला अडीच वर्षांसाठी उपमहापौर पद, भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला फॉर्म्यूला

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (RPI) कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले आणि आशिष शेलार.

BMC Election | मुंबई –  मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने सत्ता वाटपाचा फॉर्म्यूला तयार केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचा (ठाकरे गट) भगवा मुंबई महापालिकेवर फडकत आहे, तिथे भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला सत्ता मिळाल्यास महापौर भाजपचा आणि उपमहापौर पद शिंदे गटाला देण्याचा फॉर्म्यूला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केला आहे. शिंदे गटाला दिले जाणारे उपमहापौर पद हे अडीच वर्षांसाठी शिंदे गटाकडे तर पुढील अडीच वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) दिले जाईल असे शेलार यांनी जाहीर केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) रविवारी मुंबईतील सोमय्या मैदानावर महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास रिपाईला अडीच वर्षांसाठी उपमहापौर पद दिले जाईल. रिपाईला सत्तेत योग्य वाटा दिल्याशिवाय मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता पूर्ण होणार नाही, असेही शेलार म्हणाले.

हेही वाचा : अयोध्येत गेलेल्याच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर; सामनातून एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका

शेलार यांनी जाहीर केलेला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला हा भाजप पक्षश्रेष्ठींनी अजून मंजूर केलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या फॉर्म्यूलावर चर्चा करणार असल्याचे शेलार म्हणाले. मुंबई महापालिका निवडणूक रिपाई, भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीसोबत लढवणार असल्याचे केंद्रीय राज्य मंत्री आठवले म्हणाले. आमच्या उमेदवारांना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने निवडून आणावे असेही आवाहन आठवले यांनी केले आहे. रिपाई मुंबई महापालिकाच नाही तर राज्यातील सर्वच महापालिका निवडणूक भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीसोबत लढणार असल्याचेही आठवले यांनी जाहीर करुन टाकले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर होईल. पाच वर्षात पहिल्या अडीच वर्षांसाठी उपमहापौर पद आरपीआयला आणि उपमहापौर पदाची दुसरी टर्म अर्थात उर्वरीत अडीच वर्षे शिवसेना शिंदे गटाचा होईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.


मुंबई आणि ठाणे ही दोन शहरं शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जातात. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ३९ आमदारांसह शिंदे बाहेर पडले आहेत. आता शिवसेना नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही शिंदे यांना मिळाले आहे. मुंबई पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासून सत्ता आहे, तर शिवसेनेची पहिली सत्ता ही ठाणे महापालिकेत आली तेव्हापासून ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकांवर आता शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. मात्र भाजपसोबत गेलेल्या शिंदेंना राज्यात मुख्यमंत्रीपद दिले गेले असले तरी पालिकेत उपमहापौरपदावरच समाधान मानावे लागेल, असे संकेत भाजपने दिले आहेत. यावर शिंदे गटातून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहाणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ‘बार्टी’ फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे ऊन-वाऱ्यात सलग ५० दिवस धरणे आंदोलन; मुख्यमंत्री लक्ष देणार का?

First Published on: April 10, 2023 9:34 AM
Exit mobile version