समीर भुजबळांना जामीन मंजूर…

समीर भुजबळांना जामीन  मंजूर…

समीर भुजबळ (फोटो सौजन्य- indian express news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तसेच जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर त्याच धर्तीवर आपल्याला देखील जामीन देण्यात यावा म्हणून समीर भुजबळांनी हायकोर्टात अर्ज केला होता.

 

सव्वा दोन वर्षांनी जामीन मंजूर

मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असून समीर भुजबळ यांनी यापूर्वीच त्यापैकी एक तृतीयांश कालावधी जेलमध्ये काढला आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करत आहोत, असं मत नोंदवत हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हायकोर्टाचे न्या. अजय गडकरी यांनी समीर भुजबळ यांना जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय ) समीर भुजबळ यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये अटक केली होती. जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त काळानंतर समीर भुजबळ तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

ईडीचा युक्तीवाद फेटाळून लावत जामीन मंजूर

नोव्हेंबर २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५ घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरवलं होतं. त्याच धर्तीवर छगन भुजबळ यांनी जामीन अर्ज केला आणि तो मंजूर करण्यात आला. तसाच जामीन अर्ज समीर यांनी देखील केला. अर्ज दाखल केल्यानंतर पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे समीर यांना जामीन देता येणार नाही, असा ईडीने युक्तीवादही केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद फेटाळून लावत जामीन मंजूर केला.

First Published on: June 6, 2018 1:14 PM
Exit mobile version