तंबाखू खाताय? २ लाख ६२ हजार लोकांना कर्करोगाची भीती

तंबाखू खाताय? २ लाख ६२ हजार लोकांना कर्करोगाची भीती

फोटो प्रातिनिधीक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून नॉन कम्युनिकेबल डिसीझ म्हणजेच संसर्गजन्य नसणाऱ्या आजारांसाठी अनेक शिबीरे राबवली जातात. त्यापैकीच एक म्हणजे ओरल हेल्थ कॅम्पेन (Oral health campaign) म्हणजेच तोंडाच्या आरोग्यासाठी राबवलेल्या शिबिरात सर्वात जास्त तोंडाच्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सापडले आहेत. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत राबवलेल्या मोहिमेत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये २.१४ कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. आकडेवारी पाहता जर तुम्ही तंबाखुचे सेवन करत असाल तर सावधान! तुम्हालाही तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.

कसा होतो तोंडाचा कॅन्सर?

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग बळावतो . तंबाखू, धूम्रपान आणि दारुच्या अधिक व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होतो हे सर्वश्रूत आहे. याच पार्श्वभूमीवर सिगारेट, तंबाखूच्या पाकिटावर हे खाल्यानंतर मृत्यू होतो असे चित्र देखील छापण्यात आले आहे. पण, तरीही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते आणि त्यातून कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते.

आरोग्य मोहिमेत आली आकडेवारी समोर

राज्य सरकारतर्फे तोंडाच्या आरोग्याबाबत नुकतीच मोहिम पार पडली. या मोहिमेत लोकांमध्ये तोंडाच्या कर्करोगात जागरुकता पसरवण्यासाठी एक तपास मोहीम सुरू घेण्यात आली. या तपास मोहिमेत २ लाख ६२ हजार ४३१ लोकांना तोंडाच्या कर्करोगाची पूर्व लक्षणे आढळली आहेत. तर, त्यापैकी महाराष्ट्रातील ५४४ रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे आढळले आहेत. या मोहिमेतील डॉक्टर आणि काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तंबाखूचे सेवन सोडले नाही तर येत्या १० ते १२ वर्षांत तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आणखी वाढतील आणि हे देशासमोरील खूप मोठे संकट असेल. राज्यातील लोकांना तोंडाच्या कर्करोगापासून मुक्त करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी टाटा हॉस्पिटलच्या सहकार्याने डिसेंबर २०१७ पासून राज्यभरात तोंडाच्या आरोग्याविषयी अभियान राबवण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार आतापर्यंत २ कोटींपेक्षा लोकांचं स्क्रिनिंग करुन त्यात आढळलेल्या कर्करोगाच्या रुग्णांना उपचारांवर घेण्यात आले आहे.


दरवर्षी राज्यात मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी शिबीरं घेतली जातात. त्यात लोकांच्या तोंडाची तपासणी केली जाते. डिसेंबर २०१७ या महिन्यात राबवलेल्या मोहिमेत जवळपास २ कोटींपेक्षा जास्त लोकांची तपासणी केली असून त्यात २ लाखांपेक्षा अधिक लोकांना कर्करोगापूर्वीची लक्षणे आढळून आली आहेत. प्राथमिक सर्वेक्षणात तोंडात असलेले व्रण, वेदनाविरहित अल्सर यांची तपासणी करण्यात आली. यातील ५४४ रुग्णांना तोंडाचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. त्यांच्यावर त्या त्या जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जात आहेत. शिवाय, १ हजार ७७८ बायोप्सी करण्यात आल्या आहेत. 
-डॉ. साधना तायडे, असंसर्गजन्य आजार विभागाच्या सहसंचालक


राज्यात कर्करोगाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. डिसेंबर महिन्यात राबवलेल्या शिबिरांपैकी ही मोहिम सर्वात मोठी होती. या मोहिमेत २ करोडपेक्षा जास्त लोकांची तपासणी करण्यात आली आहे. ज्यातील ५४४ लोकांना तोंडाचा कर्करोग असल्याचं आढळलं आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यात ही मोहिम राबवली जात आहे. 
डॉ. पंकज चतुर्वेदी, कर्करोगतज्ज्ञ, टाटा हॉस्पिटल

First Published on: December 6, 2018 7:00 AM
Exit mobile version