Chitra Wagh : तुमची आघाडी मिल बाँट के खाएंगेवाल्या परिवारांची, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Chitra Wagh : तुमची आघाडी मिल बाँट के खाएंगेवाल्या परिवारांची, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

संग्रहित छायाचित्र

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष सुरू झाला आहे. ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सगळ्यांना मोदी-अमित शहा अटक करू शकतात, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अभिनेता गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात? मुख्यमंत्री शिंदे देणार उमेदवारी

भाजपा कोणालाही अटक करू शकते. मोदी-अमित शहांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सगळ्यांना ते अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर या सगळ्यांची भीती वाटत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले किंवा फासावर लटकवले. मोदी सरकार त्याच पद्धतीने काम करत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

त्याबाबत चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. ज्या आम आदमी पार्टीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवली, त्याच पक्षाच्या मुख्यमंत्री, मंत्र्यांनी मद्य घोटाळा करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. आता तपास यंत्रणांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढून पुरावे दिले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. कायद्याने आपले काम चोख बजावले तरी, चोरांच्या उलट्या बोंबा मारणे सुरूच आहे. संजय राऊत यांनी ‘आप’वाल्यांच्या सुरात सूर मिळवणे साहजिक आहे, कारण तुमची आघाडीच जनतेसाठी लढणाऱ्या पक्षांची नसून ‘मिल बाँट के खाएंगे’वाल्या परिवारांची आहे, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Satyapal Malik : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्यपाल मलिकांचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे त्यात?

ज्या अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा वारस म्हणतात, हीच भाजपाची अक्कल आहे, अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आप’वाल्यांच्या भ्रष्टाचारावरून तुमच्या मेंदूची शीर का तडतडत आहे, ते समजून येईल. कारण भ्रष्टाचाराच्या धाग्याने घट्ट बांधलेले गेलेले तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहात. या एका मुद्द्यावरून तुमचा याराना इतका घट्ट आहे की, भ्रष्टाचाराच्या कुरणात आरामात चरता यावे म्हणून इंडी आघाडीचा घाट घातला. त्यामुळेच कायद्याचे पालन म्हणजे तुम्हाला नकोसे लोढणे वाटते, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – CM Kejriwal: मला दु:ख नाही, त्याने माझं ऐकलं नाही; केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

First Published on: March 22, 2024 4:14 PM
Exit mobile version