Kirit Somaiya Pune : सोमय्यांचा सत्कार अन् मनपा पायऱ्यांचे गोमुत्राने काँग्रेसकडून शुद्धीकरण

Kirit Somaiya Pune : सोमय्यांचा सत्कार अन् मनपा पायऱ्यांचे गोमुत्राने काँग्रेसकडून शुद्धीकरण

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सत्कार समारंभावरून पुण्यात वाद पेटला आहे. पुणे महापालिकेच्या आवारात किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली. परंतु भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत किरीट सोमय्यांचा सत्कार समारंभ करण्यावर ते ठाम होते. त्यानुसार भाजपच्या नगरसेवकांनी सोमय्यांचा सत्कार केला. मात्र, त्यांच्या सत्कारानंतर पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

मनपा पायऱ्यांचे गोमुत्राने काँग्रेसकडून शुद्धीकरण

किरीट सोमय्यांच्या सत्कारानंतर काँग्रेसकडून मनपाच्या पायऱ्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आलं. तसेच काँग्रेसने सर्व पायऱ्या स्वच्छ केल्या आहेत. भारतीय जनता पार्टी पुणे महापालिकेत सत्तेमध्ये आहे. यामध्ये रस्ते, खड्डे, आरोग्य आणि इतर कोविड सारखे प्रश्न असताना सुद्धा भाजपाकडून किरीट सोमय्या यांचं सत्कार करणं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ही पायरी त्यांच्या संस्कृतीप्रमाणे आम्ही गोमूत्र आणि गुलाब पाण्याने धुतलेली आहे. पुणे अशा प्रकारच्या कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही. ज्या पद्धतीने भाजपा काम करत आहे, त्याचा निषेध म्हणून मी ही पायरी धुतलेली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या कार्यकर्त्याने दिलीय.

कोविड सेंटरबाबत सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. घोटाळ्याबाबतची तक्रार करताना किरीट सोमय्यांवर हल्ला झाला होता. या प्रकरणातच किरीट सोमय्यांनी कोविड सेंटरच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटरचे कंत्राट दिलेली कंपनी जाहीर करावी, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. या कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही किरीट सोमय्या म्हणाले. एक चहावाल्याला १०० कोटींचे कंत्राट मिळते, या कंपनीचे बेनामी पार्टनर कोण हे ठाकरे आणि राऊत यांनी सांगावे, असे किरीट सोमय्या म्हणाले.


हेही वाचा : Kirit Somaiya : चहावाल्याच्या १०० कोटींचे कोविड सेंटरचे कंत्राट, बेनामी पार्टनर ठाकरे – राऊतांनी सांगावे – किरीट सोमय्या


 

First Published on: February 11, 2022 5:02 PM
Exit mobile version