औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे असेही ते म्हणाले.

नव्या योजनेची कामे वेळापत्रकानुसार झालीच पाहिजेत हे परत एकदा स्पष्ट करून ठाकरे यांनी जुनी जलवाहिनी बदलण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा लगेच सादर करावा असे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीस कंत्राटदार कंपनीच्या मालकांनी किंवा कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधीने उपस्थित राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेवरून सरकारला कानपिचक्या देताना या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेऊन औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा आढावा घेतला.

केंद्राकडून पाठपुरावा करून परवानगी आणा

जायकवाडी धरणातील उद्भव विहीर ( जॅकवेल ) घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेन. पण ही परवानगी मिळेपर्यंत इतर कामे थांबू देऊ नका. जलकुंभ, पाईप्स कोटींग करणे त्याचबरोबर खोदकाम ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत, मी स्वत: ती कामे पाहणार आहे. शहरात पाणी वितरणासाठीच्या आराखडयास देखील वेळच्यावेळी परवानगी पालिकेने दिली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कामे खोळंबता कामा नये, असे ठाकरे यांनी सांगितले.

पाईप्सचा पुरवठा होण्यास सुरुवात

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी माहिती देतांना सांगितले की, या कामास वेग देण्यात आला असून कंत्राटदाराने सर्व ८३.६२ किमी डीआय पाईप्स मागविले आहेत तसेच ७८० मी लांबीचे एमएस पाईप्स तयार करण्यात आले असून कोटींगचे काम सुरू आहे. जल शुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभाच्या तराफे भिंतींची कामे वेगाने सुरू आहेत. १६० किमी साठी एचडीपीई पाईप्सचा पुरवठा करण्यात आला असून १३.०४ किमी डीआय पाईप्सचा पुरवठाही कंत्राटदारास करण्यात आला आहे.


हेही वाचा : तुम्ही चुकीचा निर्णय घेतला अन् लोक रस्त्यावर उतरले, असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर टीका


 

First Published on: June 17, 2022 7:53 PM
Exit mobile version