संघटन मजबुतीसाठी काँग्रेस सक्रिय, राज्यात १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवणार

संघटन मजबुतीसाठी काँग्रेस सक्रिय, राज्यात १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवणार

आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होताच कॉंग्रेसने राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. उदयपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डीत घेतलेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबाजणी राज्यभर केली जाणार आहे. त्यासाठी राज्यभर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या निर्णयाची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या ‘भारत तोडो’ ला काँग्रेस ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिर्डी कार्यशाळेसाठी उदयपूर शिबीराच्या धर्तीवर सहा विषयांसाठी सहा गट स्थापन करण्यात आले होते. या सहा गटांनी चर्चा करून त्यांचा अहवाल सादर केला. यातूनच शिर्डी घोषणापत्र व कृतीकार्यक्रम तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली.

वाढती महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, अग्निपथ, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आवाज उठवणार आहे. राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ अभिनयानही राबविले जाणार आहे. काँग्रेसचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवतानाच केंद्र सरकारच्या अपयशाची माहितीही जनतेला करून दिली जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

शिर्डी कार्यशाळेत राज्यभरातून ३०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. दोन दिवसाच्या विचारमंथातून काँग्रेससाठी एक दिशादर्शक कार्यक्रम बनवण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही भूमिका मांडू आणि जनतेच्या हितासाठी या सर्व विषयांचा पाठपुरावा केला जाईल, असे कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

तर राज्यात समविचारी पक्षाबरोबर आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यासाठी एक जिल्हा स्तरावर समीक्षा समिती स्थापन केली जाईल. त्या समितीच्या निर्णयाचा विचार करून राज्य पातळीवर आघाडीचा बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीसह काँग्रेस विचाराची साहित्य निर्मिती आणि प्रचार करण्यासाठीही एक समिती बनवण्याचा विचार यात मांडण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

First Published on: July 18, 2022 9:02 PM
Exit mobile version