कोरोना योद्धे विसरले नाही सारथीला लालपरीच्या चालकांना रिटर्न गिफ्ट!

कोरोना योद्धे विसरले नाही सारथीला लालपरीच्या चालकांना रिटर्न गिफ्ट!

गेल्या चार महिन्यांपासून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या डॉक्टर, नर्सेस या कोविड योद्ध्यांचा पालघर-मुंबई असा सुखरुप प्रवास घडवून आणणार्‍या एसटी महामंडळाच्या पालघर विभागातील चालक वाहकांना आभार मान्यासाठी सायन आणि के.ई.एम रुग्णालयातील कर्मचारी पुढे आले आहे. या खर्‍या कोविड योद्ध्यांनी एसटीचा पालघर विभागाला वॉटर मशीन देऊन आपली त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या मदतीसाठी आम्ही कधीही पुढे येऊ असे वचन सुद्धा दिले आहे.

हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मानले आभार

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. देशभरात सतत लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे. अशात सार्वजनिक वाहतूक व्यस्था बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या डॉक्टर, पोलीस,स्वच्छता आणि महापालिका कर्मचार्‍यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील एसटीच्या बसेस धावत आहे. कोरोना विषाणू हा माणसामाणसाद्वारे वाढतो. ही भीती मनात ठेवून एसटी कर्मचारी काम करत आहे. आतापर्यंत ३००  पेक्षा जास्त एसटी कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांचा मुत्यूही झालेल्या आहे. अशा अडचणीच्या काळात चालक आणि वाहक आपली निस्वार्थ सेवा देत होते. त्यांच्या सेवेमुळे अनेकांच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचल्या आहेत. कारण सायन आणि केईएम रुग्णालयातील अनेक डॉक्टर, परिचालीका, वॉर्ड बॉय, नर्सेस आणि इतर कर्मचारी पालघर जिल्ह्यात राहतात. कोरोनाच्या महामारीत लोकल सेवा बंद होती. त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपल्बध होत्या. एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांनी कोरोनाकाळात पालघर – मुंबई असा सुखरुप प्रवास घडवून आणला आहे. त्यामुळे त्यांच्या नोकर्‍या सुद्धा सुरक्षित राहिल्या आहे. चालक वाहक यांचे कृतज्ञता म्हणून सायन आणि केईएम हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी वरगणी गोळा करून एसटीच्या पालघर विभागाला वॉटर मशीन भेट स्वरुपात दिली आहे. तसेच एसटी कर्मचार्‍यांचे आभार सुद्धा मानले आहे.

एसटी कर्मचारी झाले भावूक

अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील एसटीच्या बसेस धावत आहेत. मात्र, कर्तव्यावर अनेक कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे इतर विभागातून एसटी कर्मचारी बोलविण्यात आले होते. आगारातच राहून कुटुंबियांची पर्वा न करता या कोरोनाच्या संकटकाळात आपली सेवा देत होते. त्यांच्या या कामाची दखल घेऊन अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वॉटर मशीन देऊन आपली त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे ही एसटी कर्मचार्‍यांची मोठी शान असते.

कोरोना काळात पालघर विभागाकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची वाहतूक सुरू आहे. त्यांची सुरक्षित वाहतूक केल्यामुळे सायन आणि केईएम रुग्णालयातील या खर्‍या कोविड योद्ध्यांनी आम्हाला वॉटर मशीन देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. आमच्यासाठी ही बाब खरच उत्साह देणारी आहे.
– नितीन चव्हाण, आगार व्यवस्थापक, पालघर
First Published on: August 16, 2020 6:59 PM
Exit mobile version