महाराष्ट्रातील जनतेच्या नाकावर टिच्चून…, पदमुक्तीच्या विनंतीनंतर काँग्रेसची राज्यपालांवर टीका

महाराष्ट्रातील जनतेच्या नाकावर टिच्चून…, पदमुक्तीच्या विनंतीनंतर काँग्रेसची राज्यपालांवर टीका

मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राज्यपाल पदी आल्यापासून त्यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यातच, आज त्यांनी राजीनाम्याची विनंती केल्यानंतर काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत, तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा – मोठी बातमी! राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची कोश्यारींची इच्छा, पंतप्रधान मोदींना विनंती

राजभवानातून याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर होताच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, “राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही ‌ याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!”


दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नवनवीन वाद असे समीकरणच बनले आहे. यावरून विरोधकांनी त्यांना वारंवार हटविण्याची मागणी लावून तर धरली आहेच. शिवाय, भाजपालाही प्रत्येकवेळी त्यांच्या बाजूने सारवासारव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपर्यंत किंवा प्रजासत्ताक दिनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांना माघारी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.


‘माय महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणे केले असून याबाबत दिल्लीतील त्यांचे बॉस केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याकडेही कोश्यारींबाबत काय करायचे, याचा निर्णय विचाराधीन आहे, असेही समजते. सध्या महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांचा नवा वाद नसल्याने हीच योग्य वेळ साधत येत्या आठवड्याभरात राज्यपाल कोश्यारींबाबत केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

First Published on: January 23, 2023 4:37 PM
Exit mobile version