छत्रपती शिवरायांपासून ते मोदींपर्यंत, नोटांवर कोणाचा फोटो हवा? नेत्यांकडून सूचनांचा पाऊस

छत्रपती शिवरायांपासून ते मोदींपर्यंत, नोटांवर कोणाचा फोटो हवा? नेत्यांकडून सूचनांचा पाऊस

अर्थव्यवस्था, महागाई आणि निवडणुकांचे मतदान यानंतर आता नोटांवरील फोटोंवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. यानंतर देशभरात आता नोटांवरील फोटोचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अरविंद केजरीवालांच्या विधानानंतर आता नोटांवर कोणाचा फोटो हवा? यावरून राजकारणात आरोप- प्रत्यारोपांचा डाव सुरु आहे. एकापाठोपाठ एक राजकीय नेते नोटांवर कोणाचा फोटो हवा याबाबत सूचना करत आहेत. विशेष म्हणजे या मुद्द्याला विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडूनही आता सूचनांचा पाऊस सुरु आहे. या नोटांवर काहींकडून गणपती देवी लक्ष्मी, तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत अनेकांचे फोटो चलनी नोटांवर हवा अशी मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी म्हटले की, भारतीय चलनी नोटांवर गांधीजींसोबत देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा असे केंद्र सरकारला आवाहन करतो. देशाच्या ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेला यातून आशीर्वाद मिळेल, यासाठी अनेक पावले उचलावीत, हा निर्णय देखील त्यापैकीच एक आहे. दिवाळीला आपण सर्वजण समृद्धीसाठी लक्ष्मीजी आणि विघ्नहर्ता गणपतीची पूजा करतो.’ यावेळी केजरीवालांनी इंडोनेशियाचे उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले.

केजरीवाल पुढे म्हणाले की, इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश आहे. याठिकाणी 85 टक्के मुस्लिम आणि फक्त 2 टक्के हिंदू आहेत. तरीही त्यांच्या चलनावर श्री गणेशाचा फोटो आहे. यामुळे पंतप्रधानांना आवाहन आहे की, नवीन नोटांवर माता लक्ष्मी आणि श्री गणेशजींचा फोटो असावा. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील केजरीवालांच्या मागणीचे समर्थन केले आहे.

विशेष म्हणेज या मागणीस विरोध करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांकडूनही आता या मागणीस पाठींबा मिळतोय. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी चलनी नोटांवर छत्रपती शिवरायांचा फोटो असावा अशी सूचना केली आहे. नितेश राणे यांनी ट्विटवर 200 रुपयांची नोट पोस्ट करत ‘हे परफेक्ट आहे’ असे म्हटले आहे.

यानंतर भाजपचे आमदार राम कदम (Raam Kadam) यांनीही 500 रूपयांच्या नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापावा अशी मागणी केली आहे. राम कदम यांनी 500 रुपयांच्या चार नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला एस फोटो ट्वीट करत म्हटले की, ‘अखंड भारत… नया भारत… महान भारत… जय श्रीराम… जय मातादी’

यानंतर काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी नोटांवर कोणाचा फोटो हवा याबाबत पर्याय सुचवला आहे. तिवारींनी नोटांवर बाबासाहेबांचा फोटो का असू शकत नाही, असा सवाल केला आहे. तिवारींनी ट्विट करत म्हटले की, ‘नव्या नोटांच्या सीरिजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का असू शकत नाही? एकीकडे थोर महात्मा आणि दुसरीकडे डॉ. आंबेडकर…अहिंसा, संविधानवाद आणि समतावाद यांच्यासोबत एकत्र येण्याने आधुनिक भारत एक होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी अखिल भारत हिंदू महासभेनेही चलनी नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो असावा मागणी केली होती. यावर पश्चिम बंगालचे कार्याध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी म्हणाले होते की, ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजींचे योगदान महात्मा गांधींपेक्षा कमी नाही, असे आम्हाला वाटते. भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकाचा सन्मान करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चलनी नोटेवर त्यांचे चित्र. यावेळी गांधींच्या फोटो ऐवजी नेताजींचा फोटो लावावा.

दरम्यान भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, केजरीवाल सरकार आपल्या त्रुटी आणि आम आदमी पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय खेळी खेळत आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जे काही सांगितले ते राजकारणातील त्यांच्या यू-टर्नचा आणखी एक भाग आहे. यातून त्यांचा ढोंगीपण दिसून येत आहे.


दरम्यान चलनी नोटांवरून आता राज्यासह देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापतेय.  या प्रकरणाला सुरुवात करणाऱ्या केजरीवारांवर निडणुकीसाठी हिंदू कार्ड खेळल्याचा आरोप होत आहे.


नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा; भाजप आमदाराची मागणी


First Published on: October 27, 2022 12:28 PM
Exit mobile version