वरळीच्या श्रीराम मिलच्या चौकात शिवसेनेची दहीहंडी

वरळीच्या श्रीराम मिलच्या चौकात शिवसेनेची दहीहंडी

मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी भव्य दहीहंडी (Dahi Handi 2022) सोहळ्याचे आयोजन केले आहे. मात्र, शिवसेनेही त्यांच्या दहीहंडीला पर्यायी जागा शोधली असून, वरळीतच ही दहीहंडी होणार आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेने यांच्यात दहिहंडीवरून राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Dahi Handi of Shiv Sena at Shriram Mill Chowk Worli)

भाजपाने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दहीहंडीचे आयोजन वरळीच्या श्रीराम मिल चौकात केल जाणार आहे. त्यामुळे आता वरळीत शिवसेना आणि भाजपाकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आशिष शेलार यांनी वरळीच्या जांबोरी मैदानात दहिहंडीचे आयोजन केल्याने शिवसेनेला वरळीतील दहिहंडीच्या आयोजनासाठी जागा शोधावी लागली. विशेष म्हणजे वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद असतानाही आता आशिष शेलार यांनी दहिहंडीचे आयोजन केल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वरळी मतदारसंघातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना वरळीच्या दहीहंडीबाबत प्रश्न विचारला असता. त्यांनी याबाबत भाष्य केले.

“वरळी सगळ्यांना आवडायला लागली आहे. वरळी ए प्लस होत आहे. आणि प्रत्येकाने तिथे येऊन दहीहंडी साजरी करावी. आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. हा सण आहे. दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ होता, स्वाईन फ्लूपण वाढत होता. हे सगळ झाल्यानंतर आपल्याला सण-वार कुठेतरी साजरे करायला मिळत आहे. यात उगीच कार्यकर्त्यांची लढाई लावणे, मारामारी करणे, पोलीस केस घेणे किंवा लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करणे पोलिसांवरील ताण वाढवणे यात कुठेही आम्ही जाणार नाही. वरळीत करु दे वांद्र्यात करू दे , कुठेही करु दे. जो कोणी सण साजरं करतोय. आम्ही या पोरकटपणात जाणार नाही, ना कोणताही बालिशपणा करणार की आम्हाला इथेच करायचा आहे तिथेच करायचा आहे. सगळ्यांनी सण साजरा करावा पण यात कुठेही राजकारण करु नये”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.


हेही वाचा – वरळी सगळ्यांना आवडू लागलीय, त्यांना मी एकदा वरळीत फिरवेन; आदित्य ठाकरेंचा शेलारांना टोला

First Published on: August 17, 2022 1:51 PM
Exit mobile version