दरेकरांनी गोंधळ घालण्यापेक्षा योग्य सूचना कराव्यात – अनिल परब

दरेकरांनी गोंधळ घालण्यापेक्षा योग्य सूचना कराव्यात – अनिल परब

दरेकरांनी गोंधळ घालण्यापेक्षा योग्य सूचना कराव्यात - अनिल परब

महिलांच्या सुरक्षेसाठी गरज पडली तर कठोर कायदा करु, पण महिलांच्या पाठीशी समाजाने उभे राहायला हवे. पक्षनीवेश बाजूला ठेवून महिलांना कमी लेखणाऱ्या नतद्रष्ट नेत्यांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला बाजूला सारले जायला हवे, असे सडेतोड उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तरीही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणत असतील की त्यांना बोलू दिले नाही, तर त्यांना संसदीय कार्यपद्धती शिकण्याची गरज आहे, असे खरमरीत उत्तर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

दरेकर यांनी दावा केला की त्यांना बोलू दिले गेले नाही, मुख्यमंत्री यांचे प्रबोधनाचे भाषण झाल्यावर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी कोणत्याही सदस्याला बोलण्याची परवानगी दिली नाही. यावर परब म्हणाले, दरेकर यांना सभागृहाचे कामकाज कसे चालते, नियम काय आहेत, हे माहीत नसावे. खरे तर सभागृह नेता किंवा मुख्यमंत्री यांनी कुठल्याही चर्चेला उत्तर दिल्यावर त्यानंतर विरोधी पक्षाला Right of Reply अर्थात प्रत्युत्तराचा अधिकार नसतो. दरेकर साहेब, तुम्ही नवीन आहात, आम्ही समजू शकतो की अजूनही तुम्हाला स्वत:च्या मनाने बोंबलण्याचा अधिकार नाही. तुमचे बोलविते धनी तुमच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर बसतात आणि काय बोलावे याचे निर्देश तुम्हाला देत असतात. सन्माननीय दरेकर, तुम्ही स्वतःच कबूल केले आहे की तुम्ही म्हणजे विरोधी पक्षाने गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. याचाच अर्थ तुमच्या गोंधळामुळे सभागृहचे कामकाज चालवणे सन्माननीय उपसभापती यांना अशक्य झाले असेल म्हणून सभागृहाचे कामकाज गुंडाळले. सन्माननीय दरेकर, आपणही सत्तेत होता आणि आपण सभागृहात कसे वागत होता, याची आम्ही आठवण करून द्यायला हवी का?


हेही वाचा – ऑस्ट्रलिया आणि भारतामध्ये रंगणार वर्ल्ड कपचा अंतिम सामना

परब पुढे म्हणाले, या ठिकाणी एक बाब नमूद करतो. आजच्या चर्चेला महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री उत्तर देऊ शकल्या असत्या. पण सन्माननीय उपसभापती यांनी मा. मुख्यमंत्री यांना सभागृहाला उत्तर देण्याची सूचना केली आणि मा मुख्यमंत्री यांनी सभागृहाला उत्तर दिले. पण ते आपल्याला प्रबोधन वाटत असेल तर तो मा. मुख्यमंत्री यांचा गौरव म्हणायला हवा. त्यांच्यावर प्रबोधनकार ठाकरे यांचे संस्कार आहेत, म्हणूनच त्यांनी महिलांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहावे आणि त्यात पक्ष येऊ नये, असे आवाहन केले. मा. मुख्यमंत्री आणि शिवसैनिक कधीही तुम्हाला आवडणारी मुलगी पळवून आणा, मी लग्न लावून देतो, असा सल्ला देणार नाही, कारण आमचे आणि तुमचे संस्कार यात प्रबोधनाचा फरक आहे. तूर्तास एवढेच सांगतो.

 

First Published on: March 5, 2020 11:08 PM
Exit mobile version