उत्तम संसदपटू, प्रभावी वक्ते आपल्यातून निघून गेले; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक

उत्तम संसदपटू, प्रभावी वक्ते आपल्यातून निघून गेले; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक

संग्रहित छायाचित्र

पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिश बापट यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गिरीश बापट यांना देशभरातील नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आता त्यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ता आपल्यातून निघून गेल्याचे  म्हणत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार, असा त्यांचा प्रवास. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती, असेही फडणवीस म्हणाले.

पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेतीसुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

( हेही वाचा: Girish Bapat passed away: संघ स्वयंसेवक, कामगार नेते ते खासदार ‘अशी’ राहिली गिरीश बापटांची चार दशकांची कारकिर्द )

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे फडणवीस म्हणाले.

First Published on: March 29, 2023 2:26 PM
Exit mobile version