‘मविआची सभा म्हणजे निराश लोकांचे अरण्यरुदन’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

‘मविआची सभा म्हणजे निराश लोकांचे अरण्यरुदन’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

संग्रहित छायाचित्र

‘कालची सभा म्हणजे निराश लोकांचे अरण्यरुदन आहे. ज्यांची सत्ता गेल्याने ते निराश आहेत, बावचळलेले आहेत, तोल गेलेले आहेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर निशाणा साधला. तसेच, ‘आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही समस्या सोडवतो, लोकांमध्ये जातो, विकास करतो’, असेही फडणवीस म्हणाले. (DCM Devendra Fadnavis Slams MVA vajramuth Meet Mumbai)

मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूलन (बीकेसी) येथील मैदानात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाषण केले. उपस्थित जनतेला संबोधित करताना सर्व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विशेषत: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला होता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

“कालची सभा म्हणजे निराश लोकांचे अरण्यरुदन आहे. ज्यांची सत्ता गेल्याने ते निराश आहेत, बावचळलेले आहेत, तोल गेलेले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्याला किती महत्त्व दिलं पाहिजे हे ठरवणे गरजेचे आहे. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही समस्या सोडवतो, लोकांमध्ये जातो, विकास करतो”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर निशाणा साधला.

“वन रुपी क्लिनीक बद्दल ते सांगत होते, पण अडीच वर्षात एकही क्लिनीक सुरू केलेले नाही. मात्र, सोमवार (1 मे) आम्ही 350 आपला दवाखाना सुरू केले. त्यामुळे ही लोक नुसतं बोलणारे, तोंडाची वाफ दवडणारे आणि टीका करणारे आहेत. जनतेच्या प्रती यांना काहीही पडलेली नाही”, असेही देवेद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“निवडणुका होतील आणि आम्ही त्यांना पराभूत करू. निवडणुका दररोज होत नाहीत. त्यामुळे निवडणुका वेळेत होतील आणि आम्ही त्यांना चारीमुंड्याचीत करू”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


हेही वाचा – पाकिस्तानमधील हिंगलाज माता उत्सवात दोन वर्षांनी भारतीय हिंदू सहभागी

First Published on: May 2, 2023 9:54 AM
Exit mobile version