स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल…; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल…; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

कॉग्रेस नेते राहुल गांधी हे हिंगोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतके वाईट बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात. याचे मला अतिशय वाईट वाटते. याबाबत मी विचार केल्यास मला वाटते की स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल की त्या राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करताहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. तसेच, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. (DCM Devendra Fadnavis Slams Thackeray Group Leader Aaditya Thackeray)

कॉग्रेसच्या भारत जोडो यात्रेच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांनी गळाभेट घेतल्याचे फोटो समोर आले. या फोटोनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा धागा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता आणि ज्यावेळी कोणीही सावकरांच्या विरुद्ध एक शब्दही बोलला, तर त्याला चपखल अशाप्रकारचे उत्तरही मिळत होतं. ते कृतीतूनही मिळत होत आणि शब्दातूनही मिळत होतं. पण आता कॉग्रेस नेते राहुल गांधी हे हिंगोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतके वाईट बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात. याचे मला अतिशय वाईट वाटते. याबाबत मी विचार केल्यास मला वाटते की स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल की त्या राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करताहेत”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.

“मला मान्य आहे, की तुमचे-आमचे पटलं नसेल. तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. पण तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल तर, बाळासाहेबांशी नात सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का”, असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

“बाळासाहेबांशी नातं हे रक्तानी होत नाही, ते विचारांनी करावे लगाते. विचारांचे नाते हे बाळासाहेबांशी असलेलं खरं नातं आहे. आणि जो-जो विचारांचं नात याठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल, म्हणून याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली. रक्तानी कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील पण विचारांनी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत. म्हणूनच हे त्यांच्या कुटुंबातील आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देताना आपण निर्धार करूया की, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहिल आणि जोपर्यंत सावरकरांना आपमानित करणारे देशामध्ये आहेत या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा हा विचार जमीनीमध्ये गाढल्याशिवाय राहणार नाही”, असा निर्धारही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला.


हेही वाचा – राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहीत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

First Published on: November 16, 2022 9:17 PM
Exit mobile version