ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, लवकरच शपथविधी

ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, लवकरच शपथविधी

मुंबईः मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान 30 हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर ते गुजरातमधील सूरतमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळालीय. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर शिवसेनेच्या पायाखालची जमीनच सरकलीय. शिवसेनेनं तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवून शिवसेनेचे आमदार अजय चौधरींना ते बहाल केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्यात जमा असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची संध्याकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असून, त्यात ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे त्यांच्या सत्तेचा वाटाही ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं जमलं असून, आज रात्री किंवा उद्यापर्यंत याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कारण संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

एकनाथ शिंदे माघार घेण्याची शक्यता कमी असून, आता भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील. उत्तर प्रदेशचा जो फॉर्म्युला होता, तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू केला जाणार असून, राज्यातही दोन उपमुख्यमंत्री पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक चेहरा हा ओबीसींचा असेल, मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतील, असं सांगितलं जात आहे. ज्या पद्धतीनं अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, त्याचप्रमाणे महत्त्वाचं अर्थमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वतःकडे घेतील. अशा पद्धतीची त्यांची बोलणी सुरू असल्याचंही समजतंय.

जर मंत्रिमंडळाचा विचार केला तर सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 10 राज्यमंत्री आहेत. एकूण 43 मंत्री आहेत. 43 ते 44 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. महाविकास आघाडीत सर्वात कमी 10 कॅबिनेट मंत्री आणि 4 राज्यमंत्री शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र या नव्या 44 मंत्र्यांमध्ये शिवसेनेला किमान 14 कॅबिनेट मंत्री आणि किमान 4 राज्यमंत्रिपद दिले जातील. एकनाथ शिंदेंचा जो गट आहे, तो शिवसेनेचा अधिकृत गट मानायचा की शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे जे काही 12 ते 15 आमदार असतील तो अधिकृत गट मानायचा ही कायदेशीर प्रक्रिया विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 38 आमदार आहेत, असं सध्या तरी चित्र आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे किती आमदार आहेत हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.


हेही वाचाः नार्वेकर, फाटक यांना एकनाथ शिदेंची भेट घेण्यासाठी पाठवणे फक्त औपचारिकताच?

First Published on: June 21, 2022 6:35 PM
Exit mobile version