प्रोटोकॉल तोडून धनंजय मुंडे मध्यरात्रीच बेळगावात

प्रोटोकॉल तोडून धनंजय मुंडे मध्यरात्रीच बेळगावात

धनंजय मुंडे

कर्नाटकमधील सीमाभागातील मराठी माणसांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बेळगावात दाखल झाले आहेत. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले.  मंगळवारपासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, मुंडे यांचं अशाप्रकारे बेळगावात जाणं वादात अडकण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे कर्नाटक सरकारच्या बंदीला झुगारुन बेळगावात दाखल झाले आहेत. मुंडे सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. धनंजय मुंडेंनी पोलीस बंदोबस्त नसतानाही या मेळाव्याला हजर राहण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते रविवारी संध्याकाळीच कोल्हापुरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.


वाचा : आरक्षणासाठी भांडतो म्हणून पोटात दुखतं का? – धनंजय मुंडे

पत्रकारपरिषदेदरम्यान धनंजय मुंडे म्हणाले, “कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसने कायम पाठिंबा दर्शविला आहे. बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने दीर्घ काळापासून लढा दिला आहे. हा लढा पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येईल. तसंच मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येईल”, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी सर्व प्रोटोकॉल तोडत अशाप्रकारे बेळगावात दाखल होणं आणि मेळाव्याला संबोधित करणं, राजकीय वर्तुळात कोणत्या नव्या वादाला तोंड फोडणार का? हे येणारी वेळच सांगेल.


वाचा : आरक्षणाबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे

First Published on: December 10, 2018 4:29 PM
Exit mobile version