नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. आज दुपारी 12 वाजता काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसने नाशिक मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत आहे, त्यामुळे काँग्रेससह भाजपचा उमेदवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 13 जानेवारीला दाखल अर्जांची छाननी होणार आहे. तर 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी आपला अर्ज माघारी घेऊ शकतात. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळात मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

आमदार डॉ. तांबे यांनी देशातील नावजलेल्या बी.जे. मेडिकल महाविद्यालयातून एम.एस.पर्यंत शिक्षण घेतले, यानंतर संगमनेरमध्ये गेली चार शतके गोरगरिबांना आरोग्य सेवा दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी संगमनेरच्या सहकारी, शिक्षण, समाजकारण, कृषी क्षेत्रात मोलाचे काम केले. यासोबत आदिवासी, अपंग, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी मोठं कार्य केलं आहे.

राजकारणात आल्यानंतर डॉ. तांबे यांनी आपली कार्यक्षम आमदार म्हणून ओळख निर्माण केली. यात नाशिक पदवीधर मतदार संघात त्यांनी बेरोजगारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, विविध संघटना यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे. काँग्रेस पक्ष आणि पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ असलेले आमदार डॉ. सुधीर तांबे हे 2009 मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून विधान परिषदेत त्यांची निवड झाली आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, ठाकरेंसोबतच युती करणार : प्रकाश आंबेडकर

First Published on: January 12, 2023 12:38 PM
Exit mobile version