आंजर्ले येथे पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; तिघांचा मृत्यू

आंजर्ले येथे पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; तिघांचा मृत्यू

दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील औंधचे सहा रहिवासी आंजर्ले समुद्रकिनारी फिरण्यास गेले होते. त्या दरम्यान, त्यांनी समुद्रात उतरुन पाण्याचा आनंद लुटला. मात्र, तीन जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

नेमके काय घडले?

पुणे जिल्ह्यातील औंध येथून निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे हे सहा पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आले होते. हे पर्यटक दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सहाही पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडाले. या घटनेबाबत गावातील गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फक्त तिघांचे प्राण वाचवू शकले. इतर तीन पर्यटक हे बेपत्ता होते. त्यांचाही शोध स्थानिक घेत होते.

या घटनेची माहिती दापोली पोलिसांनाही देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. काही वेळाने हे तिघेही मृतावस्थेत आढळून आले. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – बैलाच्या गळ्याभोवती दोर आवळून केलं ठार


 

First Published on: December 18, 2020 1:57 PM
Exit mobile version