राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून लागली हेसुद्धा पवारांनी सांगावं, फडणवीसांचा घणाघात

राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून लागली हेसुद्धा पवारांनी सांगावं, फडणवीसांचा घणाघात

Early morning swearing-in | मुंबई – पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. अवघ्या ७६ तासांच्या या सरकारमुळे राज्यातील राजकारणालाच वेगळी दिशा मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या या राजकीय खेळीची चर्चा अडीच वर्षांनंतरही रंगते आहे. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही या शपथविधीमागे शरद पवारांचा हात होता असा गौप्यस्फोट केला होता. शरद पवारांनीही फडणवीसांच्या या वक्तव्याला मुकसंमती दिली आहे. आता फडणवीसांनी शरद पवारांना आणखी एक प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाचंही उत्तर पवार देतात का हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीचे गुऱ्हाळ आणि पवारांची खेळी

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात मोठा दावा केला होता. ‘ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करून सर्वकाही ठरले होते. पण नंतर गोष्टी बदलल्या,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी आज खुलासा केला आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यात जी राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती उठली, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केलं. याचाच अर्थ पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा छुपा पाठिंबा होता हे सिद्ध होतंय, अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी मौन सोडलंच! म्हणाले…

शरद पवारांनी खुलासा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एक प्रश्न विचारला आहे. “या खुलाशानंतर, आता माझी श्री शरद पवार जी यांच्याकडे अजून अपेक्षा आहे की त्यांनी हे ही सांगावे की राष्ट्रपती राजवट का लागली, कुणाच्या सांगण्यावरून लागली?”, असा प्रश्न फडणवीसांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रश्नाला शरद पवार उत्तर देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी दिल्यास पहाटेच्या शपथविधीबाबत निर्माण झालेले गोंधलाचे चित्र स्पष्ट होईल.

First Published on: February 22, 2023 7:16 PM
Exit mobile version