महापालिका बालवाड्यांचे सक्षमीकरण; जिओ मॅपिंगद्वारे ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण

महापालिका बालवाड्यांचे सक्षमीकरण; जिओ मॅपिंगद्वारे ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण

मुंबई महापालिका शिक्षण विभाग पालिका शाळांमध्ये डिजिटल, आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच बालवाड्यांच्या सक्षमीकरणावर अधिक जोर देत आहे. सध्या विविध ठिकाणी पालिकेच्या ९०० बालवाड्या सुरू आहेत. मात्र आणखीन कोणत्या ठिकाणी किती बालवाड्या सुरू करून मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणायचे यासाठी जीओ मॅपिंगद्वारे ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण केले आहे. लवकरच उर्वरित सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याची माहिती राज्य सरकारच्या वेबसाईडवर अपलोड करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका शिक्षण विभाग सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभाग गेल्या अनेक वर्षांपासून पालिका शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब, कॉम्प्युटर आदींच्या माध्यमातून आधुनिक व डिजिटल शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे.

शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी, पालक यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबतची ओढ पाहता पालिकेने काही ठिकाणी मुंबई पब्लिक स्कुल सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे पालिकेने लहान मुलांमध्ये बालपणापासूनच शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालवाड्या सुरू केल्या असून आतापर्यंत ९०० बालवाड्या सुरू केल्या आहेत.

मात्र आणखीन कोणकोणत्या भागात नव्याने बालवाड्या सुरू करणे आवश्यक आहे, यासाठी पालिकेने बालवाड्यांचे जीओ मॅपिंगद्वारे सक्षमीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. बालवाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती राज्य सरकारच्या वेब साईटवर अपलोड करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली.


हेही वाचा : पटक देंगेची भाषा करणाऱ्यांना मातोश्रीवरच यावे लागले होते, अरविंद सावंतांचे


 

First Published on: September 5, 2022 10:49 PM
Exit mobile version