मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ‘पुडी’ची देवाणघेवाण; ‘शंभूराजेंनी सांगितलं ‘पुडीत’ काय?

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ‘पुडी’ची देवाणघेवाण; ‘शंभूराजेंनी सांगितलं ‘पुडीत’ काय?

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे विरोधकांनी सभा त्याग करत विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. याशिवाय विधानसभेत आज अवकाळी पाऊस, वाढती महागाई, कायद्या-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहिला मिळाले. अशातच विधानसभेत एक लक्षवेधी घटना पाहायला मिळाली आणि या घटनेने सर्वांना चर्चा करण्यास भाग पाडले.

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना भरत गोगावले यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांकडे इशारा करत काहीतरी मागितले. या इशाऱ्यानंतर पुढच्या बाकावर बसलेल्या शंभूरजा देसाई यांनी स्वतःच्या खिशातून काढून एक पुडी गोगावलेंना दिली. पण हे देवाणघेवाण दृश्य कॅमेरात कैद झाले आणि माध्यमांमध्ये वारंवार दाखवण्यात आले.

नेमकी कशाची ‘पुडी’ दिली यावरुन चर्चा सुरू झाली असताना यावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शंभूराज देसाईं म्हणाले की, मी सभागृहामध्ये बसलेला असताना आमचे सहकारी भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली. मी तंबाखू खात नाही तुम्ही कोणालाही विचारा. भरत गोगावलेसुद्धा तंबाखु खात नाहीत. आम्हाला सगळे नियम माहित आहेत पण तंबाखू खात नसल्यामुळे विषयच येत नाही. मसाला इलायची नेहमी माझ्याकडे असते. ती मसाला इलायची आता सुद्धा माझ्याकडे आहे. हे मसाला इलायचीचे पाकीट आहे. अधिवेशनादरम्यान घशाला कोरड पडल्यावर एखादा तुकडा खाल्यावर घशाला बरे वाटते. नेहमीप्रमाणे भरत गोगावलेंनी माझ्याकडे मसाला इलायची मागितली आणि मी त्यांना दिली. याच्याव्यतिरिक्त काही नाही. मी गेली १५ वर्षे या सभागृहाचा सदस्य आहे. सभागृहामध्ये काय नियम पाळावे याची सगळी माहिती मला आहे. घशाला कोरड पडल्यामुळे एखादा इलायचीचा तुकडा खाल्लाने मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेल नाही.

आदित्य ठाकरेंनी केली टीका
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी ‘पुडी’ प्रकरणात बोलताना हा निंदनीय प्रकार असल्याची टीका केली आहे. संसदेमध्ये जी प्रथा परंपरा आहे, जे नियम आहेत त्याचे पालन होताना दिसत नाही. जर आपले राज्यकर्ते असे वागायला लागले, तर हे आदर्श राज्यकर्ते कसे होणार. त्यामुळे आजच्या प्रकारावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

First Published on: March 24, 2023 9:45 PM
Exit mobile version