फडणवीसांचं वक्तव्य चिथावणीखोर, त्यांचं स्वप्न पूर्ण होणारच नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जहरी टीका

फडणवीसांचं वक्तव्य चिथावणीखोर, त्यांचं स्वप्न पूर्ण होणारच नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जहरी टीका

मुंबई – कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावाद (Maharashtra Karnatak Border Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. दोन्ही राज्यात भाजपाची सत्ता असल्याने राज्यातील विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरलाय. दरम्यान, महाराष्ट्रातील एकही गाव दुसऱ्या राज्यात जाऊ देणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रावासीयांना दिलं. मात्र, यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी देवेंद्र फडणवीसांवरच टीका केली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिलीय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची टीका

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं. परंतु, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं बसवराज बोम्माई यांनी म्हटलंय.

जतमधील गावांचा ठराव २०१२ मध्ये झाला होता. आता याबाबत कोणताही ठराव झालेला नाही. हे शत्रुत्व नाही, कायदेशीर लढाई आहे. एकही गाव महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याला बसवराज यांनी चिथावणीखोर वक्तव्य म्हटलं आहे.

हेही वाचा – उद्योग-गावं पळवली, सरकार देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिषीमध्ये अडकले; संजय राऊतांचा घणाघात

सोलापुरातील कन्नड भाषिक गावांना कर्नाटकात सामील करण्यात येण्याचा प्रस्ताव बसवराज बोम्माई यांनी ठेवला आहे. २०१२ ला कर्नाटकात जत तालुक्यात ही गावे यावीत अशी मागणी होती. जत तालुक्यातील पाण्यासाठी राज्य सरकारचे काम सुरू आहे. सामोपचाराने हा विषय सोडवला पाहिजे, यासाठी आम्ही बैठका घेतल्या आहेत. जत तालुक्यातील लोकांसाठी आम्ही योजनेत सुधारणा केल्या आहेत. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अजित पवारांची टीका

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काल सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला होता. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावाबाबत वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली आहे की काय कळत नाही, अशा शेलक्या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र असातसा वाटला का तुम्हाला? आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावबाबत वक्तव्य केलं. काहीही संबंध नसताना अशाप्रकारचे वक्तव्ये करून लोकांचं लक्ष विचलीत करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक भाषेत प्रत्युत्तर दिलं पाहिजे. याआधी अशी वक्तव्ये होत नव्हती. महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली आहे की काय कळत नाही, असं अजित पवार म्हणाले.

First Published on: November 24, 2022 2:50 PM
Exit mobile version