पुत्रासाठी पित्याची कसरत

पुत्रासाठी पित्याची कसरत

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

शिवसेना भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींनी युती केली असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना- भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अजूनही मनोमिलन झालेले दिसून येत नाही. भिवंडीनंतर आता कल्याणमधील शिवसैनिकांनी भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे नाराज शिवसैनिकांची मनधरणी करताना शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच दमछाक होत आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळे कल्याणात शिवसेनेला भाजपचे सहकार्य आवश्यक आहे. भाजपने कल्याणात नाराजीची भूमिका घेतल्यास शिवसेनेची चांगलीच पंचाईत होणार आहे. त्यामुळे पुत्रासाठी पित्याला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना भिवंडीतून शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला असतानाच, आता कल्याणातील शिवसेनेनेही बंडाचे निशान फडकवले आहे. शिवसेनेचे सुरेश म्हात्रे यांनी भाजपला सहकार्य करणार नसल्याचे खुलेआम आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. भाजप विरोधात लढण्यासाठी म्हात्रे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्ली गाठली होती. त्यामुळे भिवंडीत शिवसेना विरूध्द भाजप अशीच अवस्था पाहावयास मिळत आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून शिंदे यांनाच शिवसैनिकांची मनधरणी करावी लागत आहे. मात्र स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे यांनाही जुमानत नाहीत.

कल्याण पश्चिमेचा परिसर हा भिवंडी लोकसभा मतदार संघात येतो. कपिल पाटील यांच्यावर शिवसेनेची नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत युती झाल्यानंतरही पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना सहकार्यासाठी एकही फोन केलेला नाही. याची नाराजीही एका पदाधिकार्‍याने शिंदे यांच्याकडे व्यक्त केली हेाती. मात्र शिंदे यांनी फोनची वाट पाहू नकोस कामाला लाग असे आदेश त्या पदाधिकार्‍याला दिले होते. काही दिवसांपूर्वीच कल्याणात युतीचा मेळावा पार पडला. त्यावेळी खासदार पाटील यांनी माझी काही चूक झाली असेल, तर माफ करा अशी जाहीर दिलगिरीही व्यक्त केली होती.

मात्र खासदारांच्या दिलगिरीने शिवसैनिकांचा राग अजूनही शांत झालेला दिसत नाही. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार नरेंद्र पवार आहेत. मात्र हा मतदार संघ शिवसेनेला देण्यात यावा अन्यथा कपिल पाटील यांचे काम करणार नाही अशी जाहिर भूमिका शिवसेनेचे स्थानिक नेते अरविंद मोरे यांनी मांडली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमधील वाद आणखीनच पेटण्याची शक्यता दिसून येते आहे.

First Published on: April 4, 2019 4:52 AM
Exit mobile version