‘या’ १७ शहरात फटाक्यांवर बंदी; फटाके विकले अन् फोडले तरी बसणार भुर्दंड

‘या’ १७ शहरात फटाक्यांवर बंदी; फटाके विकले अन् फोडले तरी बसणार भुर्दंड

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये फटाके वाजवण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला यंदा कोरोना काळात इतर सणांप्रमाणेच, दिवाळीही साधेपणाने करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यात फटाक्यांच्या वापरावर बंदी आहे. महाराष्ट्रातही काही शहरात फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. फटाके विकल्यास आणि उडवल्यासही दंड भरावा लागणार आहे.

यासह कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना फटाक्यांच्या धुरामुळे होणारा त्रास अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यावरही बंदी आणली असून राज्यात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) पुण्यासह १७ शहरात फटाक्यांवर बंदीचा आदेश देण्यात आला आहे. सोमवारी या याचिकेवर न्या. आदर्शकुमार गोयल यांनी निकाल दिला असल्याची माहिती मिळतेय.

‘या’ शहरांमध्ये फटाके फोडण्यास मनाई

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक शहरांत हवेचा दर्जा खालावल्याची माहिती असून त्यापैकी अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर ही १७ प्रदूषित शहरे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवरील बंदी कायम असणार आहे. फटाके विकल्यास २० हजार रुपये दंड, तर फटाके वाजवल्यास २००० रुपये दंड आकारण्यात येईल, असा आदेश देण्यात आला आहे.


मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी

First Published on: November 10, 2020 4:42 PM
Exit mobile version