खुशखबर…बांधकाम मजुरांना मिळणार फक्त ५ रुपयात जेवण

खुशखबर…बांधकाम मजुरांना मिळणार फक्त ५ रुपयात जेवण

बांधकाम मजुरांना मिळणार ५ रुपयात जेवण

बांधकाम मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बांधकाम मजुरांना लवकरच फक्त ५ रुपयात जेवण मिळणार आहे. हे जेवण मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या चार शहरांमधील बांधकाम मजुरांना मिळणार आहे. या योजनेला दीनदयाळ उपाध्यायांचे नाव दिले जाणार आहे. कामगार विभागांतर्गत येणाऱ्या बांधकाम मजूर मंडळाच्या माध्यमातून ही योजना चालविली जाणार असून या योजनेसाठी शासन अनुदान देणार आहे.

ही असणार जेवणाची मेजवानी

बांधकाम मजुरांना देण्यात येणाऱ्या जेवणात चपाती, डाळ, भाजी, चटणी, वरण – भात, भाज्या अशा पद्धतीचे गरमागरम जेवण मिळणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मजूर दररोज उभे राहतात त्या नाक्यांवर हे जेवण सकाळी ते कामावर निघण्यापूर्वी पोहोचविले जाईल. भविष्यात मोठमोठ्या टाऊनशिपच्या ठिकाणी पाचशेहून अधिक मजूर काम करतात त्या ठिकाणी त्या मजुरांना दुपारी जेवण पोहोचविणार आहे.

२० हजार मजुरांना मिळणार जेवण

या योजनेचे कंटात्र चार विविध कंत्राटदारांना देण्यात आले असून त्यांना अत्याधुनिक आणि स्वयंचलित स्वयंपाकगृह उभारण्याची अट टाकण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी उभारणी केली आहे. वीस हजार मजुरांना दरदिवशी जेवण पुरविण्याची त्यांची क्षमता आहे. ही योजना सुरुवातीला चार शहरांमध्ये सुरु करण्यात येणार असली तरी पुढील टप्प्यात ती राज्याच्या अन्य भागांतही सुरु करण्यात येणार आहे.

कार्ड स्वॅप केल्यानंतर मिळणार जेवण

या बांधकाम मजुरांना एक कार्ड दिले जाणार आहे. ते कार्ड स्वॅप केल्यानंतर त्या मजुरांना जेवण दिले जाईल. त्यासाठीची यंत्रणा जेवण तयार करणाऱ्या कंत्राटदाराकडून राबविली जाईल. त्यावरुन रोज किती मजुरांना जेवण दिले जाणार आहे याची नोंद अचूक ठेवता येणार आहे. लोकसभी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातमध्ये २०१७ मध्ये अशी योजना लागू करण्यात आली आहे.


वाचा – जाणून घ्या जेवणातील तेलाचे प्रमाण

वाचा – जर बिल मिळालं नाही, तर तुमचं जेवण फुकट


 

First Published on: March 5, 2019 8:27 AM
Exit mobile version