हँड सँनिटाइझरची भेसळ उघडकीस, कारखान्याच्या धाडीत १९ लाखांचा माल जप्त

हँड सँनिटाइझरची भेसळ उघडकीस, कारखान्याच्या धाडीत १९ लाखांचा माल जप्त

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील गुप्तवार्ता विभागास बनावट व भेसळयुक्त हँड सँनिटाइझर चे उत्पादन तळोजा येथील एका कारखान्यात होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीची पडताळणी करून दि. १७/११/२०२१ रोजी A. A. Chemicals, MIDC तळोजा, जिल्हा रायगड या ठिकाणी प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभाग व रायगड कार्यालयाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून कारवाई केली.

सदर कारवाईत कारखान्यास सौंदर्य प्रसाधने उत्पादनाचा परवाना प्राप्त असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी विविध प्रकारची व वेगवेगळ्या ब्रँड नावाने हँड सँनिटाइझरचे विनाअनुमती, बनावट व भेसळ करून उत्पादन होत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ५ लिटर व ५०० मि. ली. च्या डब्यात लेबल लावलेला विक्रीयोग्य हँड सँनिटाइझरचा साठा उपलब्ध होता. उपलब्ध साठ्यातून ०६ नमुने चाचणी विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सुमारे १८.८४ लक्ष रुपयाचा साठा औषधे सौंदर्य प्रसाधने कायद्यातील कलम १८ (c) व १८ (B)चे उल्लंघन झाल्याने जप्त करण्यात आला.

सदर चाचणी साठी घेण्यात आलेल्या सर्व नमुन्यांच्या प्राप्त अहवालानुसार ते बनावट असल्याचे आढळून आले असून त्यात Methanol ची भेसळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एका नमुन्यात कोणतेही अल्कोहोल नसून त्यात केवळ सुगंधित द्रव असल्याचे आढळून आले आहे.

सदर उत्पादक A. A. Chemicals, MIDC तळोजा चे मालक चालक यांनी कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतीबंधात्मक उपाय म्हणून उपयोगी सिद्ध झालेल्या हँड सँनिटाइझर या औषध उत्पादनाचे विना परवाना व भेसळ करून, बनावट तसेच निकृष्ट दर्जाचे व आरोग्यास घातक ठरू शकणारे हँड सँनिटाइझर उत्पादन व विक्री करून कोविड महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत सामान्य जनतेची फसवणूक केली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वरील उत्पादन संस्थेच्या मालकांविरुद्ध दि. २८/१२/२०२१ रोजी तळोजा पोलीस स्टेशन येथे भा. दं वी. च्या कलम २७६, ४१५ व ४२० अंतर्गत गुन्हा क्र. ०४३३ नोंदविण्यात आला आहे. सदर संस्थेस त्वरित कामकाज बंद चे आदेश बजावण्यात आले असून तळोजा पोलीस व अन्न औषध प्रशासन, रायगड पुढील तपास करीत आहे.

वरील कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मा. आयुक्त श्री. परिमल सिंह , व मा. सह आयुक्त (दक्षता) श्री समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. सर्वसामान्य जनतेने औषधांच्या दर्जा बाबत कोणतीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित जिल्हा कार्यालय तसेच टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा असे आवाहन माननीय आयुक्त श्री. परीमल सिंह यांनी केले आहे.


हेही वाचा : corona virus : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितली त्रिसूत्री


 

First Published on: January 4, 2022 8:58 PM
Exit mobile version