घरठाणेcorona virus : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितली त्रिसूत्री

corona virus : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितली त्रिसूत्री

Subscribe

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुमारे २० हजार ३२६ बे़डस् उपलब्ध असून त्यापैकी ९०४४ ऑक्सिजन बेडस् आहेत. एप्रिल २०२१ मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. नागरिकांनी सावधानता बाळगत कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बरे होण्याचा दर ९७ टक्के

जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसी मध्ये ६८२५, डिसीएचसी मध्ये ६९२८, डिसीएचमध्ये ६५७३ अशा एकूण २० हजार ३२६ रुग्णशय्यांची उपलब्धता आहे त्यामध्ये विलगीकरणासाठी ८४९०, ऑक्सिजनची सोय असलेल्या ९०४४, अतिदक्षता विभागातील २७९२ रुग्णशय्यांचा समावेश आहे. ३ जानेवारी रोजीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा पॉझीव्हीटी दर हा सुमारे ७.४५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ८ लाख ९१ हजार ४८७ एवढया चाचण्या केल्या जात आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात ६ हजार ३१८ सक्रीय रुग्ण असून त्यापैकी ९०० रुग्ण सीसीसीमध्ये, २४९ रुग्ण डीसीएचसी मध्ये, ४६४ रुग्ण डीसीएच मध्ये उपचार घेत असून सुमारे ३ हजार ३९६ रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. ३४४ रुग्ण ऑक्सीजनवर असून २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन सुरू

ठाणे जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रीय रुग्ण संख्या होती. त्याला २१९ मेट्रीक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसए प्लांट, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन साठविण्यासाठी टाक्या, सिलेंडर्स यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात ३१ पीएसए प्लांट प्रस्तावित असून त्यापैकी २६ प्लांटच्या माध्यमातून ४५ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. तसेच सध्या ६७२ मेट्रीक टन लिक्विड मेडीकल ऑक्सिजनचासाठा करण्याची क्षमता जिल्ह्यात विकसीत केली असून अजून २७० मेट्रीक टन साठवणूक क्षमता विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून उपचारांच्या सुविधेसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनोवर देखील भर दिला जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप आपला पहिला अथवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी त्वरीत घ्यावा. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. गेल्या चोवीस ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही दुप्पटीने वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात साडेतीन हजार रुग्ण आढळून आले असून यामध्ये ठाणे आणि नवीमुंबई येथील रुग्ण संख्या ही तीन आकडी आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने सक्रिय रुग्णांची संख्या ही ७ हजार २९५ इतकी झाली आहे. मात्र दिवसभरात एकही जण दगावला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात तीन हजार ५०२ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ही ५ लाख ८३ हजार २७६ वर पोहोचली आहे. तर दगावणाऱ्यांची संख्या ११ हजार ६२१ वर स्थिरावली आहे. ठाणे शहरात १ हजार ३३२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही २ हजार ७० वर गेली आहे. त्यापाठोपाठ नवीमुंबईत १ हजार ७२ रुग्ण नोंदवले गेले असून तेथे २ हजार ३७९ सक्रिय आहेत. कल्याण-डोंबिवलीत ४२२ रुग्ण आढळून आले असून ९४८रुग्ण सक्रिय आहे.मीरा भाईंदर मध्ये ३८७ रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १३९ वर पोहोचली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १५१ रुग्णांची नोंदणी झाली असल्याने सक्रिय रुग्ण संख्या २६३ वर गेली आहे.

उल्हासनगरात ५२ रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्ण संख्या ही २२३ झाली आहे. कुळगाव बदलापूर, अंबरनाथ आणि भिवंडीत अनुक्रमे ४२,२९ आणि १५ रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्ण ही अनुक्रमे ७४,१४२ आणि ५७ इतकी आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

ओमिक्रॉनची ठाण्यात ८ जणांना लागण

परदेशातून ठाणे शहरात आलेल्या ८ जणांना मंगळवारी ओमायक्रॉनची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट आले आहे.ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये पाच जण महिला असून तिघे पुरुष आहेत. ६ जणांवर पार्किंग प्लाझा आणि दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सिंगापूर आणि शारजा येथून प्रत्येकी तिघे तर लंडन आणि दुबई येथून प्रत्येकी एक जण आलेला आहे.


हेही वाचा : मोदी सरकारच्या काळात देश अधोगतीला लागला – नाना पटोले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -