माजी मंत्री हसन मुश्रीफ अजित पवारांसह अमित शाह यांची भेट घेणार

माजी मंत्री हसन मुश्रीफ अजित पवारांसह अमित शाह यांची भेट घेणार

कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत माजी मंत्री हसन मुश्रीफ हे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबाबत स्वत: हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली असून, या भेटीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत सर्व ती माहिती देऊन त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. (former minister mla hasan mushrif says with ajit pawar will meet union home minister amit shah)

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत लवकरच वेळ घेऊन अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच, केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील 10 ते 15 लाख शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देत असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना आपल्या भाषणामध्ये सोलापूर, नागपूर आणि कोल्हापूर अशा तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर प्रशासक नेमावा लागल्याचा उल्लेख केला आहे. कदाचित यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमला होता, या संदर्भाने त्यांचे ते वक्तव्य असावे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील ‘गोडसाखर’ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली होती. यावेळी तब्बल 30 तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची 70 तासांनी ईडीने सुटका केली होती.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापेमारी केल्यानंतर ईडीकडून आणखी तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुलाच्या उपचारासाठी कुबेरेश्वर धामला गेले, मात्र परतताना तीन वर्षीय मुलावर काळाचा घाला

First Published on: February 19, 2023 5:25 PM
Exit mobile version