पुराव्यांअभावी कुख्यात गुंड राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा निर्णय

पुराव्यांअभावी कुख्यात गुंड राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा निर्णय

कुख्यात गुंड छोटा राजनसह चार जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २००९ सालच्या एका दुहेरी हत्याकांडातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती मिळते. छोटा राजनविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले. त्यामुळे न्यायालयाने छोटा राजनसहसह चारही आरोपींची संबंधित प्रकरणातून मुक्तता केली आहे. (gangster Chhota Rajan court order lack of evidence against him)

नेमके प्रकरण काय?

१३ वर्षांपूर्वीच्या जे. जे. सिग्नल दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने आज गँगस्टर छोटा राजनसह चार जणांची निर्दोष सुटका केली. अभियोग पक्ष सबळ पुरावे दाखल करू शकला नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनमधील टोळी युद्धातून भेंडीबाजारच्या जे. जे. सिग्नलवर दुहेरी हत्याकांड घडल्याचा आरोप जे. जे. रोड पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. मात्र, पोलिस या प्रकरणात आरोपींविरुद्ध ठोस पुरावे दाखल करू शकले नाहीत, असे निरीक्षण विशेष न्या. ए. एम. पाटील यांनी नोंदवले.

याशिवाय, आरोपींना साक्षीदारांकडून ओळखण्यात आलेले अपयश, तब्बल दीड वर्षांनंतर केलेली ओळख परेड, हत्याकांडामध्ये वापरलेल्या पिस्तूल आणि काडतुसांचा ताळमेळ न लागणे, तपासातील विसंगती आदी बाबी विशेष न्यायालयाने नमूद केल्या आहेत.

तपासातील पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यात अपयशी ठरत आहेत, असे स्पष्टपणे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून या आरोपांसाठी कारागृहात असलेल्या आरोपींची सुटका झाली आहे. यामध्ये राजनसह मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उमेद यांचा समावेश आहे.

न्यायालयाचा चौथा निर्दोष मुक्ततेचा निर्णय

न्यायालयाने छोटा राजनच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय दिला. विशेष म्हणजे चौथ्यांदा म्हणजेच आतापर्यंत चार प्रकरणात न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला आहे. याआधी छोटा राजन याच्यावर ३० ऑक्टोबर १९९९ रोजी दहिसर पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर छोटा राजन फरार आरोपी म्हणून दाखविण्यात आला होता. दहिसर येथे १९९९ साली व्यावसायिक नारायण पुजारी यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्यानंतर चार गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले होते. तेव्हापासून राजन विरोधातील खटल्यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे.


हेही वाचा – भारत जोडो यात्रेचे अकोल्यात जंगी स्वागत; महिलांनी राहुल गांधींसमोर मांडल्या व्यथा

First Published on: November 17, 2022 8:49 PM
Exit mobile version