मोदी साहेबांना हरवणारा कोणी पैदा झालाय का?, पुण्याच्या प्रचारसभेत शिंदेंचा झंझावात

मोदी साहेबांना हरवणारा कोणी पैदा झालाय का?, पुण्याच्या प्रचारसभेत शिंदेंचा झंझावात

Eknath Shinde in Pune | पुणे – पुण्यातील कसबा आणि पिंपरी येथील पोटनिवडणुकीतील प्रचार सभा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना-भाजपा युती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार रॅली निघत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातून प्रचार रॅली काढली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. तसंच, मोदी साहेबांना हरवणारा कोणी पैदा झालाय का? अशा शब्दांत विरोधकांवर बाण मारला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई किंवा सैदीहून माणसं आणा. हवं तर मेलेल्यांना जागे करा, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केले. पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खडेबोल सुनावले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, पवार साहेबांसमोर काँग्रेसचा नगरसेवक उस्मानी हिरोनी याने म्हटलं की मोदी, आरएसएस, भाजपाला हरवण्यासाठी सौदी, दुबई आणि मेलेल्या माणसांनाही आणा आणि मतदान करा आणि यांना हरवा. पण मोदी साहेबांना हरवणारा पैदा झालाय काय? असा सवाल त्यांनी जमलेल्या जनसुमदायासमोर उंच आवाजात उपस्थित करताच टाळ्या-शिट्ट्यांचा आवाज झाला.

हेही वाचा – मोदी, आरएसएसला हरवण्यासाठी सौदी, दुबईहून लोक आणा, पवारांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचे वक्तव्य

उद्धव ठाकरेंवर टीका

निवडणुकीसाठी काही लोकांनी ऑनलाईन सभा घेतील. आम्हाला वाटलं सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील. पण ऑनलाईनच आले. त्यांना कोणीतरी कळवलं असेल की येथे येऊन उपयोग नाही. सभा घेऊन आपला उमेदवार निवडून येत नाही. हेमंत रासनेच निवडून येतोय. त्यामुळे प्रवासाचा त्रास वाचवला. त्यांना ऑनलाईनच राहू द्या, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांनी काल ऑनलाईन सभा घेत पुण्यातील जनतेला संबोधित केलं होतं.


आयोग कोणताही असो रिझल्ट महत्त्वाचा

एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते तेव्हा त्यांच्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी लोकसेवा आयोगाचा उच्चार करण्याऐवजी निवडणूक आयोगाचा उच्चार केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र, त्यावर आज पुन्हा एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसेवा आयोग काय नि निवडणूक आयोग काय, रिझल्ट महत्त्वाचा. मी आणि देवेंद्र फडणवीस तो रिझल्ट आणून दाखवला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

First Published on: February 24, 2023 5:05 PM
Exit mobile version