मुसळधार पावसाचा फटका; कल्याणमध्ये दरड कोसळली, घरे पाण्याखाली

मुसळधार पावसाचा फटका; कल्याणमध्ये दरड कोसळली, घरे पाण्याखाली
दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व (Heavy rain in kalyan east) भागात पत्रीपुलाजवळ (Patripool in kalyan) डोंगरावरील हनुमान नगर भागात दरड कोसळली. या दरडीपासून काही अंतरावर घरे असल्याने सुदैवाने जीवित, वित्तहानी झाली नाही. पूर्व भागातील अडिवली-ढोकळी भागात अनेक वर्षांपासून नाल्याचे काम पालिकेकडून केले जात नसल्याने या भागात पाणी तुंबून सुमारे ४०० कुटुंबियांना फटका बसला. रात्रभर रहिवासी घरात घुसलेले पुराचे पाणी बाहेर काढण्याचे काम करत होते. (Heavy Rain in Maharashtra : landslides in Kalyan, houses under water)
हेही वाचा – विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड, बचावकार्य सुरू
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली, स्वामी समर्थ मठ रस्ता, मांडा, टिटवाळा भागाला मुसळधार पावसाचा फटका बसला. नांदिवली रस्त्यावर एक फूट पाणी असल्याने या भागातून रिक्षा चालविणे चालकांना अवघड झाले होते. नांदिवली, समर्थ मठ भागात जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षाचालक दूर अंतरावर उतरवित असल्याने त्यांना पाण्यातून जावे लागत होते. नांदिवली, स्वामी समर्थ मठ भागात अनेक बेकायदा बांधकामे झाली आहेत. नाले, गटारांचे मार्ग बुजवून माफियांनी बांधकाम केली आहेत. त्याचा तडाखा मुसळधार पाऊस सुरू झाला की परिसरातील रहिवाशांना बसत आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका भागातील अरुंद भुयारी नाला. नाल्यातील सेवा वाहिन्यांची गुंतागुंत यामुळे मुसळधार पावसात पाटकर रस्ता परिसर जलमय झाला होता.
हेही वाचा – नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळेची बस अडकली

दरडग्रस्त कुटुंबांसाठी बचावकार्य सुरू

टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली परिसरातील अनेक भागात रात्री पाणी तुंबले होते. कल्याण पूर्वेत चिंचपाडा भागात हीच परिस्थिती होती. कल्याण पूर्वेत हनुमाननगर भागात अनेक नवीन झोपड्या बांधल्या आहेत. झोपड्या बांधताना या भागात खोदकाम केले जाते. पावसाळ्यात खोदलेला भाग खचून तो कोसळतो. हनुमाननगर भागात दरड कोसळली. त्यावेळी परिसरात कोणी रहिवासी नव्हते. या दरडीपासून घरे लांब आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आपत्कालीन पथकाला या घटनेची माहिती देऊन याठिकाणी कोणताही अपघात होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना केल्या. दरडीचा रस्त्यावर आलेला भाग पथकाने बाजूला केला. दरड कोसळलेल्या भागातील पाच कुटुंबियांना राधा कृष्ण मंदिराच्या सभागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना पालिकेकडून भोजन व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. टेकडी भागाचा अन्य कोणता भाग खचला आहे का. याची पाहणी करून त्या भागातील रहिवाशांच्या स्थलांतराचा विचार केला जाईल, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.
हेही वाचा पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; हवामान खात्याकडून इशारा

पालिकेच्या दिरंगाईमुळे रहिवाशांना मनस्ताप

कल्याण पूर्वेतील अडिवली-ढोकळी भागात गेल्या सात वर्षात बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या भागातील मोकळ्या जमिनी, नैसर्गिक स्त्रोत बांधकामांमुळे माफियांनी बुजविले. या भागातील नाला अरुंद आहे. वाढत्या वस्तीमुळे सांडपाणी वाढले आहे. हा नाला रुंद करा म्हणून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील गेल्या पाच वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. नगरसेवक पाटील यांच्या प्रयत्नाने या भागात एक कोटी ७५ लाख रुपये नाला विस्तारीकरण कामासाठी प्रशासनाने मंजूर केले होते. या कामाच्या निविदा प्रक्रिया पालिकेने पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे हे काम रेंगाळले. त्याचा फटका आता रहिवाशांना बसत आहे. पालिकेच्या चुकीमुळे रहिवाशांना मुसळधार पावसाचा फटका बसत आहे, अशी टीका नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली. मंजूर दीड कोटीच्या कामातून लवकर या भागातील नाला रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
First Published on: July 5, 2022 1:31 PM
Exit mobile version