‘महा’ वादळापाठोपाठ ‘बुलबुल’ चक्रीवादळ, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

‘महा’ वादळापाठोपाठ ‘बुलबुल’ चक्रीवादळ, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळांनी सर्वांनाच हवालदिल करून सोडले असताना आता ‘बुलबुल’ हे अतितीव्र चक्रीवादळ निर्माण होत आहे. यामुळे १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान, अतिवृष्टी होण्याची शक्यता असून याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जाणवणार असल्याने बळीराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

पुन्हा अतिवृष्टीची शक्यता

‘बुलबुल’ वादळ निर्माण झाले तर पुढील आठवडाभरात ते बंगालच्या उपसागरात दाखल होईल. यामुळे चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणार्‍या हवेचा वेग ११८ ते १६५ किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंदमान निकोबार बेटे, भारताची पूर्व किनारपटटी, बंगालच्या दक्षिण भागासह म्यानमारच्या किनारपटटीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच ९ ते १३ नोव्हेंबर रोजी ओरिसा पूर्व किनारपट्टीकडे सरकून पुन्हा राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ते दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अगोदरच अवकाळीने शेतीपिकांचे झालेले नुकसान त्यानंतर ‘महा’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या वादळामुळे गुजरात, कोकण किनारपटटीवर तुरळक ठिकाणी अति जोरदार, तर मध्य, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान अर्लट जारी केला आहे. सध्या तापमानाचा चढ उतार सुरूच आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी धुके आणि दव पडण्याबरोबरच हवेत गारठा वाढत असून दुपारच्या सुमारास कडक ऊन जाणवत आहे.


हेही वाचा – मुंबईची हवा शुद्ध करणाऱ्या कृती आराखड्याला केंद्राची मंजुरी!


 

First Published on: November 5, 2019 4:47 PM
Exit mobile version