Monsoon Update: ढगफुटीमुळे नदीच्या पुरात जनावरे गेली वाहून; राज्यात सोमवारी आणखीन पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: ढगफुटीमुळे नदीच्या पुरात जनावरे गेली वाहून; राज्यात सोमवारी आणखीन पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला काल, शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. आज, रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल असे म्हटले जात आहे. पण याचा परिणाम राज्यावर होणार असून पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वीजा आणि पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अकोला जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील निर्गुणा नदीला पूर आला असून यात अनेक जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अकोल्यात पावसाचा हाहाकार

पावसाने अकोल्या जिल्ह्यात हाहाकार माजवला असून पातूर तालुक्यातील चोंडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. यामुळे निर्गुणा नदीला पूर आला असून जवळपास ३० ते ३५ जनावरे वाहून गेली आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. सध्या या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाकडून येत्या तीन ते चार दिवसांसाठी राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या, सोमवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवार ते बुधवारी यादरम्यान पालघरमध्ये वीजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार असून मुंबईत सोमवारी, मंगळवारी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच बुधवारपर्यंत ठाण्यात पावसाची उपस्थिती कायम असणार आहे.

या जिल्ह्यात अलर्ट जारी

सोमवारी औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मंगळवारी रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्यम सरींची शक्यता आहे.


हेही वाचा – Cyclone Gulab : गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीवर धडकणार, रेड अलर्ट जारी


 

First Published on: September 26, 2021 2:12 PM
Exit mobile version