Hospital Audit: राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन ऑडिट करा, जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे आदेश

Hospital Audit: राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन ऑडिट करा, जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे आदेश

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील एसीचा स्फोट झाल्यामुळे १३ रुग्णांचा जागीच मृत्यू झाला तर १ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भंडाऱ्यात चाईल्ड केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीमध्ये बालकांचा मृत्यू झाला होता. आज घडलेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व रुग्णालयातील फायर आणि ऑक्सिजन ऑडिट करण्यात येणार आहे. नाशिक आणि विरारमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. या वाहनांची वाहतूक पोलिसांच्या संरक्षणात करण्यात यावी अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बैठकीत दिल्या आहेत.

राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक घेतली होती. यावेळी मुख्य सचिवांनी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच राज्यात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून या वाहनांची वाहतूक पोलिसांच्या संरक्षणाखाली होईल तसेच परस्पर या वाहनांना वळवण्यात येऊ नये असेही निर्देश पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे. या बैठकीत रुग्ण व्यवस्था, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा,ऑक्सिजन, रुग्णालयातील बेडची व्यवस्था याबाबत सखोल आढावा घेण्यात आला.

टास्क फोर्सने सुचवल्याप्रमाणे ऑक्सिजन द्या

सर्व रुग्णालयांतील ऑडीट करताना आगीच्या घटनांची पुनावृत्ती होऊ नये यासाठी आग प्रतिबंधित उपाययोजना घ्या, रुग्णालयातील ऑक्सिजन ऑडीच करताना टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन रुग्णाला देण्यात येत आहे का नाही याची तपासणी करावी. तसेच ऑक्सिजन वाया जात आहे का नाही? रुग्णायातील ऑक्सिजन नलिका,ऑक्सिजन टॅंक याबाबत पाहणी करण्याची सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारा

सर्व जिल्ह्यात पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या यामुळे लिक्विड ऑक्सिजनवर असलेले अवलंबन कमी करायला मदत होईल. ऑक्सिजन टॅंकरची वाहतूक विना अडथळा करण्यासाठी ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. ऑक्सिजन वाहतुक ही पोलिसांच्या संरक्षणाखाली करण्यात यावी तसेच या ऑक्सिजन टँकर वळविण्यात येऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचित करण्यात आले आहे.

First Published on: April 23, 2021 10:51 PM
Exit mobile version