मालाड, अंधेरी येथील पाणीपुरवठ्यात होणार सुधारणा; सात कोटींचा खर्च अपेक्षित

मालाड, अंधेरी येथील पाणीपुरवठ्यात होणार सुधारणा; सात कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई महापालिका पाणी खात्याकडून मालाड, अंधेरी येथील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरनंतर सदर कामाला सुरुवात होणार असून ८ महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. (Improving water supply at Malad, Andheri; Expected cost of Rs 7 crore)

मुंबईला सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला वर्षभरासाठी सात तलावांमधून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. मात्र मुंबईत दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यात गळती व चोरी यांमुळे २७ टक्के पाणी वाया जाते. वास्तविक, मुंबईकरांना दररोज किमान ४,५०० ते ५,००० दशलक्ष लिटर इतक्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र वाढीव पाणी पुरवठा होण्यासाठी पालिकेने प्रस्तावित असलेल्या गारगाई, पिंजाळ, दमणगंगा आदी पाणी प्रकल्प रखडले आहेत. परिणामी नवीन जल स्रोत निर्माण झालेले नसल्याने जादा पाणीपुरवठा होणे कठीण झाले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी पुरवठा हा पुरेसा नाही.

हेही वाचा – मालाड येथील स्पावरील कारवाईत मालकाला अटक, एका महिलेची सुटका

अनेक ठिकाणी पाणी पुरवठा नीटपणे होत नाही. काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने दूषित पाणीपुरवठा होतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यास्तव, पालिका पाणी खात्याने मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक ठिकाणी जलवाहिन्या बदलणे, नवीन जलवाहिन्या टाकणे आदी कामे हाती घेतली आहेत.

यामध्येच, अंधेरी (पश्चिम) , मालाड (पश्चिम) व मालाड (पूर्व) या ठिकाणी सुरू असलेल्या पाणी पुरवठयात सुधारणा करण्यासाठी जल वाहिन्यांची ६ कोटी ६७ लाख रुपयांची कामे हाती घेतली आहेत.

हेही वाचा – Tipu sultan: जोरदार विरोधातच मालाडच्या मैदानाचे टिपू सुलतान नामकरण, राजकारण तापले

मालाड (उत्तर) या परिसरात गायकवाड नगर, म्हाडा येथील जलवाहिन्यांचे जाळे सुधारित करणे, अंबुजवाडी गेट नंबर ८, मालाड मालवणी व्हिलेज येथील २५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम, मालाड मालवणी गेट नंबर ६ येथील जलवाहिनी बदलणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

तसेच, मालाड (दक्षिण) परिसरात आरे कॉलनीत १५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, अंधेरी (पश्चिम) परिसरात २५० मिमी न व्यासाची जलवाहिनी बदलणे आदि कामे करण्यात येणार आहेत.

First Published on: June 22, 2022 7:42 PM
Exit mobile version