आठ दिवसांच्या वादानंतर अखेर इंदुरीकर महाराजांची दिलगिरी

आठ दिवसांच्या वादानंतर अखेर इंदुरीकर महाराजांची दिलगिरी

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज

संतती संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या निवृत्ती महाजाराजांना अखेर उपरती झाली. इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग उठले असताना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे आली. तर दुसरीकडे नगरच्या जिल्हा शल्यचिकीत्सकांनी महाराजांना नोटीस बजावत खुलासा मागविला असताना मंगळवारी त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमके काय घडले होते?

‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदार मातीत घालणारी होत असते’, असे विधान केले होते. यासाठी त्यांनी भागवत, ज्ञानेश्वरी आणि पुराणाचे संदर्भ दिले होते. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. अनेकांनी महाराजांचे समर्थन करत त्यांना सपोर्ट करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित केल्या होत्या. तर महिलांना संघटनांनी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीदेखील त्यांच्याविरोधात उभी ठाकली. तृप्ती देसाई यांना तर या कारणावरुन शिवराळ भाषेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने धमकावले होते. त्यामुळे महाराज वादात सापडले. वादात सापडल्यानंतर देखील त्यांनी आपल्या विधानाशी सहमती व्यक्त करत त्यासाठी पुराणाचे दाखले दिले होते.

यासंदर्भात नोटीस मिळाल्यावर महाराजांनी माध्यमांवर आगपाखड करत यासंदर्भात कायदेशीर मार्गाने जाणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या वादामुळे वैतागलेल्या महाराजांनी अखेर मंगळवारी एक पत्रक काढत दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

‘महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग. गेल्या आठ दिवसांपासून माझ्या किर्तनाच्या सेवेतील त्या वाक्यामुळे सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासह इतर समाज माध्यमात माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून माझ्या २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रध्दा निर्मुलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरुपी सेवेतील त्या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो’.


हेही वाचा – दिल्लीला ‘ती’ टीप कुणी दिली? राज्य सरकारने तपास करावा – शरद पवार


First Published on: February 18, 2020 1:31 PM
Exit mobile version