सावरकर अवमानप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मागणी

सावरकर अवमानप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मागणी

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे त्यांनी सावरकरांची, देशाची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केली. सावरकर यांच्याविषयी माहिती न घेता, त्यांच्या योगदानाचा अभ्यास न करता त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांनी सावरकर अंदमानातील ज्या कोठडीत होते त्या कोठडीत राहून दाखवावे; आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू, असे आवाहनही सामंत यांनी केले.

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तर शिवसेना-भाजपाने राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेनेने काल, सोमवारी काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सावरकरांचे विविध क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांना माफीवीर म्हणून संबोधणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. त्यावर राहुल गांधी यांनी, माझ्या टीकेने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी टीका करणार नाही, अशी भूमिका मांडल्याची चर्चा आहे.

या चर्चेचा आधार घेत उदय सामंत यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना, राहुल गांधी यांनी यापुढे सावरकरांबद्दल बोलणार नाही, असे चार भिंतीच्या आत बोलण्यापेक्षा जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळी सामंत यांनी उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मूग गिळून गप्प होते. उलट, या पक्षाचे नेते यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही राजकीय होती. विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. आता मालेगावच्या सभेत सल्लागारांनी सांगितल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हे दैवत असल्याचे बोलले गेले. आता राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी केली म्हणून तुम्ही काँग्रेसची साथ सोडणार काय? असा सवाल उदय सामंत यांनी केला.

‘त्या’ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न
शिवसेना-भाजपच्या वतीने काढण्यात येणारी सावरकर गौरव यात्रा ही राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी नसेल तर सावरकरांचे विचार वडीवस्तीपर्यंत पोहचविण्यासाठी असेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल विचारले असता उदय सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कुणाच्याही मनात किंतु-परंतु असण्याचे कारण नाही, असे सांगून या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

First Published on: March 28, 2023 9:39 PM
Exit mobile version